रात्री लवकर झोप येत नाही आणि दिवसा लवकर उठवत नाही. असं रडगाणं गातच आजच्या तरूणाईची दिवसाची सुरवात होते. अशावेळी घाई घाईतच घराबाहेर पडणार्यांचा नियमित व्यायाम तर सोडा पण नीट नाश्तादेखील होत नाही. मग डाएट, जीमचे प्रयत्न कितीही केले तरीही शरीर हेल्दी बनत नाही. परिणामी अनेक आजारांना आमंत्रण आपणच देत असतो. नक्की वाचा : टीनएजर्सनी जीममध्ये घाम गाळणे योग्य आहे का ?
साधारण अशीच काहीशी स्थिती अभिनेत्री मिताली मयेकरची सुमारे 2 महिन्यांपूर्वी होती. पण ‘मॅगी’वेडी मिताली आता पिंकाथॉनची युथ अॅम्बॅसेडर झाली आहे. कसा होता मितालीचा हा प्रवास, काय आहेत मितालीचे फिटनेस सिक्रेट्स याबाबतची ही दिलखुलास आणि खास मुलाखत !
- पिंकाथॉन युथ अॅम्बेडर झाल्यानंतर तुझ्यात काय बदल झालेत ? जबाबदारी काय आहे ?
‘आजकाल आपण तरूण मंडळी सगळ्याच बाबतीत काहीना काही कारणं सतत शोधत असतो. एकीकडे फीटनेस, फीगर आणि डाएटच्या नादापायी अगदी काटेकोर बंधनं पाळणारी मंडळी तर दुसरीकडे आपल्याला काही त्रास नाही म्हणजे आपण ठणठणीत असा समज करून ‘चील’ राहायचं ! असं मत असणारी तरूणाई. मीदेखील साधारणं दुसर्या विभागात मोडायची असं मिताली मयेकर सांगते.
सुमारे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत आरामात झोपणं आणि सकाळ -संध्याकाळ खायला ‘मॅगी’ या गोष्टी मितालीच्या दिनक्रमात हमखास असायच्या. ‘ नैसर्गिकरित्या माझा मेटॅबॉलिझम चांगला असल्याने जंकफूड खाल्ल्याने माझ्यावर किंवा वजनावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून ‘आरोग्य’,’व्यायाम’ याकडे कधीच विशेष लक्ष दिलं नव्हतं. पण हळूहळू मॅगी खाण्याच्या सवयीवरून तिच्या सहकलाकारांकडूनच ओरडा मिळायला लागला. त्याचा परिणाम म्हणून जंकफ़ूड खाणं कमी केलं आणि काही हेल्दी खाण्याची सवय लावून घेतली. असं मिताली सांगते. आता सकाळी वेळेत उठून दूध पिऊन मिताली बाहेर पडते. दिवसभरात किमान एक फळं, 4 पोळ्या, भाजी, वरण-भात असा संतुलित आहार मितालीला आवडायला लागला आहे. 2′ मिनिटांत बनतात हे पाच हेल्दी पदार्थ, मग मॅगी कशाला हवी?
हळूहळू मितालीच्या दिनक्रमात झालेला हा बदल तिला खर्या अर्थाने ‘फ्रेश’ ठेवायला लागला. अशातच मितालीची पिंकाथॉन युथ अॅम्बॅसेडर म्हणून निवड झाली. पिंकाथॉनशी जोडलं गेल्यानंतर समाजातील अनेक स्त्रियांशी मितालीची ओळख झाली.दरम्यान काही कॅन्सर पिडीत, अंध महिलादेखील भेटल्या.एक साधारण 16 वर्षांची अंध मुलगी 21 किमी मॅरोथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून जिंकू शकते.मग ही प्रेरणा आपण का घेऊ नये ? या जिद्दीने मिताली 19 मार्च 2017 ला एक पिंकाथॉन धावणार आहे.
पिंकाथॉन निमित्त मिंलिद सोमण यांच्यासोबत भेटीचा अनुभव कसा होता ?
मिलिंद सोमण यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे असं त्यांना भेटल्यावर वाटूच शकत नाही. त्याचं आजूबाजूला असण्यात, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप सकारात्मक उर्जा आहे. पण मिलिंद सोमण यांचा एक खास फंडा आहे. कोणालाही त्यांच्यासोबत सेल्फी हवा असल्यास हेल्थशी संबंधित खास किंवा काही व्यायम करावा लागतो. त्याप्रमाणे मलाही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्लॅन्क करावे लागले. असे मिताली सांगते. त्यामुळे त्यांच्याकडून हेल्दी राहण्याची प्रेरणा नक्कीच प्रत्येकालाच मिळते. मिंलिंद सोमण यांनी मितालीला युथ अॅम्बॅसेडर म्हणून भेटल्यानंतर तू 5 काय 10 किमी धावायला पाहिजे असा सल्ला वजा आव्हानच दिलं आहे.’माझ्यासाठी हे एक चॅलेंज असलं तरीही विशेष मेहनत करून ते पूर्ण करण्याचा’ निर्धार मितालीने व्यक्त केला आहे.
पिंकाथॉनची तयारी,फीटनेस आणि काम सगळं कसं सांभाळतेस ?
‘मी बारीक असल्याने वजन वाढवण्यासाठी डाएटकडे बघतेय’ असे मिताली सांगते. आता जंकफूड कमी करून त्याऐवजी बॉर्नव्हिटा दूध, कॉर्नफ्लेक्स, फळं आणि पोळीभाजी, भात -वरण असा पूर्ण आहार घेण्याकडे भर मितालीचा असतो.
व्यायाम करताना योगा किंवा जीम करण्याऐवजी मी प्लॅन्क आणि क्रन्चेस करण्याकडे भर देते. पण त्यालाही थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी आवडीचं गाणं लावून त्याच्या वेळेइतक प्लॅन्कच्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. मॅरॅथॉन धावण्यासाठी शरीराचा स्टॅमिना उत्तम असणं गरजेचे आहे. त्यासाठी सेटवरच दोरीच्या उड्या मारण्याचा सल्ला माझ्या सहकार्यांनी दिला आहे. नक्की वाचा : वजन वाढवण्यासाठी नाश्त्यामध्ये ठेवा हे ’7′ हेल्दी टेस्टी पदार्थ
आजच्या तरूणांना काय संदेश देशील ?
आळस आणि प्रत्येक गोष्टीला कारणं देऊन पळवाट शोधणं थांबवा. अनेकजण जीम उत्साहाने लावतात. पण नव्याचे नऊ दिवस झाल्यानंतर त्यांचा उत्साह मावळतो. कामाचा ताण, अपुरी झोप अशी कारणं देऊन जीम आणि व्यायाम दोन्ही बंद करतात. हे टाळण्याचा सल्ला मितालीने दिला आहे. झोप अत्यंत प्रिय असणारी माझ्यासारखी मुलगी बदलू शकते तर कोणीही स्वतःमध्ये बदल करू शकतो पण इच्छाशक्ती ठेवा. मग आपोआपच इच्छा असेल तिथे मार्ग सापाडतोच.
मितालीच्या आवडीच्या खास गोष्टी -
- आवडतं फूड - मोमोज
- प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - अर्थात मिलिंद सोमण
- चीट फूड – मॅगी
- तुझ्यामते, फीटेस्ट अॅक्टर – मिलिंद सोमण / आणि उत्तम बॉडी – ऋतिक रोशन
- फीटेस्ट अॅक्टर फीमेल – दीपिका पादूकोण आणि शिल्पा शेट्टी
छायाचित्र सौजन्य - Mitali Mayekar/ Instagram