वाचनामुळे माणसाच्या बुद्धीचा व व्यक्तीमत्वाचा विकास होतो.वाचनामुळे व्यक्तीमध्ये वैचारिक समृद्धी येते.मात्र आज दुर्देवाने वाचनाची आवड कमी असल्याचे दिसून येते.मुलांमधील विचारांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी मुलांना वाचनाची गोडी लावणे खूप गरजेचे आहे. मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी त्यांना लहानपणापासून पुस्तकांची संगत देणे आवश्यक आहे.अगदी चार महिन्याच्या बाळाला देखील तुम्ही पुस्तक दाखवून त्याच्या मनात पुस्तक वाचनाची आवड निर्माण करु शकता.अशी वाचनाची सवय लवकर लावल्यामुळे तुमची मुले बराच वेळ व भरपुर अवांतर वाचन करण्यास शिकू शकतात.
मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी काही सोप्या टीप्स-
१.लहानपणीच सवय लावा -
मुलांच्या मनात लहानपणापासून पुस्तकांबद्दल कुतूहल निर्माण करा.यासाठी सोपा मार्ग म्हणजे गरोदरपणी व बाळ लहान असताना त्यांच्या पालकांनी पुस्तकांचे वाचन करणे.लहान बाळासमोर पुस्तक वाचताना त्यांना जरी शब्द व चित्रे समजत नसली तरी त्यांच्यावर वाचनाचा चांगला संस्कार होतो.मुलांसाठी वाचन करण्यासाठी मोठया आकाराच्या रंगीत व आकर्षक पुस्तकांपासून सुरुवात करा.तुमच्या बाळाला पुस्तकामधील प्राण्यांची मोठी चित्रे दाखवा व त्यांच्या नावांचा मोठ्याने उच्चार करा.तुमच्या बाळाला देखील यामुळे खुप मौज येईल.
२.योग्य प्रकारची पुस्तके निवडा-
जर तुम्ही तुमच्या नऊ महिन्याच्या बाळासमोर पेपरबुक ठेवले तर त्याला त्यातील काहीच समजणार नाही.यासाठी तुमच्या तान्हूल्यासमोर त्याला स्पर्श करताना आनंद होईल असे आकर्षक पुस्तक ठेवा.सहा महीन्यांच्या पेक्षा मोठ्या बाळासाठी बोर्ड बुक विकत घ्या व एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी एक ते दोन वाक्यांमध्ये गोष्टी व आकर्षक चित्र असेलले स्टोरी बुक्स विकत घ्या.दोन वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी अधिक स्पष्टीकरण असलेली स्टोरी बुक्स विकत घ्या. जाणून घ्या या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा
३.घरी पुस्तके मुलांना सहज घेता येतील अशी ठेवा-
आजकाल अनेक स्त्रिया/नवमाता नोकरी करतात त्यामुळे फक्त रात्रीच मुलांना गोष्ट सांगणे अथवा संवाद साधणे शक्य असते.मात्र यावर उपाय म्हणून दिवसभर तुमच्या मुलांना सहज हाताळता येतील किंवा त्यांच्या आजी-आजोबांबरोबर त्यांना वाचता येतील अशी काही पुस्तके घरातील बुकशेल्फमध्ये खालच्या कप्प्यात ठेवा.त्यामुळे मुले त्यांना हवी तेव्हा पुस्तकांच्या संगतीमध्ये राहू शकतात.यामुळे मुलांना पुस्तकांची आवड निर्माण होऊ शकते. नक्की वाचा या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !
४.पुस्तके स्वत: देखील वाचा-
तुम्हाला माहीत आहेच की मुले तुमचे ऐकण्यापेक्षा केवळ तुमचे निरिक्षण करुनच आधिक गोष्टी शिकत असतात.त्यामुळे आधी स्वत:ला पुस्तक वाचनाची गोडी लावा.त्यांच्यासमोर जर तुम्ही पुस्तके वाचली तर सहाजिकच मुलांवर नकळत पुस्तक वाचनाचा सुंदर व बौधिक संस्कार आपोआप घडू शकतो.
५.सातत्य राखा व आनंद घ्या-
मुलांना सतत व नियमित पुस्तक वाचनाची आवड लावा.रोज जर मुलांसोबत तुम्ही पुस्तक वाचले तर मुलांना ही नित्यनियमाने करण्याची एक गोष्ट आहे असे वाटते.त्यामुळे मुले रोज पुस्तक वाचन करण्यात रमतात.मुलांना पुस्तक वाचनात गुंतलेले असताना पहाणे खुप मजेशीर असते.तुम्ही देखील त्यांच्यासमोर वाचन करताना मोठ्यांंने पुस्तक वाचा.तसेच गोष्टींच्या पुस्तकामधील एखादी गोष्ट शिकवताना त्यांच्यामनात पुढची गोष्ट व चित्रांबद्दल उत्सुकता निर्माण करा.
Read this inEnglish
Translated by R.Prameela
छायाचित्र सौजन्य: Shutterstock