किडनीच्या आजाराला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण हा आजार फार उशिरा समजतो. आजार समजल्यावर आपल्याला जाग येते आणि आपण आपल्या जुन्या चुकीच्या सवयी सोडून नवीन आरोग्यपूर्ण सवयी अंगिकारतो. पण किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी हे पुरेसं नाही. खूप वेळा किडनी निकामी झाल्यावर ती बदलण्याचा म्हणजेच किडनी ट्रांसप्लांटेशनचा किंवा लाइफलॉंग डायलिसिसचा सल्ला दिला जातो. आणि पुढील आयुष्य सुरळीत होण्यासाठी हे करणे गरजेचे असते.
अनेकदा आपल्या रोजच्या सवयीचा परिणाम आपल्या किडनीवर होत असतो. आणि हळूहळू किडनी खराब होऊ लागते. पण त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. मुक्ता डायलिसिस सेंटर मुंबईच्या नेफ्रोलॉजिस्ट आणि मेडिकल डिरेक्टर Dr Joytsna Zope यांच्या सल्ल्यानुसार जसे किडनीचे आरोग्य खालावत जाते तसे शरीर परिस्थितीशी जुळवून घेऊ लागतं. आणि हे किडनी पूर्णपणे खराब होत नाही तोपर्यंत चालू राहतं. शरीराची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता संपली की किडनी खराब झाल्याचे लक्षात येते.
किडनीचे आरोग्य राखण्यासाठी या ५ गोष्टीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण: टाईप २ चा मधुमेह असलेल्याना किडनीचे आजार होण्याची भीती अधिक असते. मधुमेहाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होते किंवा शरीराची हार्मोन वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. याचा परिणाम किडनीवर होतो. कारण किडनीला अधिक रक्त फिल्टर करावे लागते. अनेक वर्षे कामाच्या अतिरिक्त भारामुळे किडनीमधील छोट्या रक्तवाहिन्याचे कार्य मंदावते. व टॉक्सिन्स पूर्णपणे काढून टाकण्यास त्या अकार्यक्षम ठरतात. या स्थितीत शरीरात अधिक प्रमाणात पाणी व मीठ तयार होते. आणि प्रोटिन्स लघवीवाटे बाहेर टाकले जातात. ही किडनी खराब झाल्याची लक्षणे आहेत. याचा परिणाम म्हणजे किडनी निकामी होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा. त्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, ध्यान जरूर करा. या सगळ्यामुळे मधुमेह तर नियंत्रित राहीलच पण तुमच्या किडनीचे आरोग्य ही राखले जाईल.
रक्तदाबात सतत होणारा बदल: जर तुम्हाला उच्च रक्तदाबा सोबत मधुमेह देखील असले तर तुमच्या किडनीचे आरोग्य धोक्यात आहे. उच्च रक्तदाबामुळे किडनीजवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमकूवत होतात. त्यामुळे किडनीला कार्य कारणासाठी पुरेशा रक्ताचा पुरवठा होत नाही. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे किडनीला ऑक्सिजनचा व पौष्टीक घटकांचा कमी पुरवठा होतो. त्यामुळे कालांतराने नेफ्रॉन्स खराब होतात व किडनी टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास अकार्यक्षम ठरते. म्हणून किडनीचे कार्य सुरळीत होण्यासाठी उच्च रक्तदाब असलेल्यांनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचा प्रयन्त करावा.
प्रोटिन्सचे अधिक सेवन: काही अहवालानुसार असे दिसून आले आहे की आहारात अधिक प्रमाणात प्रोटिन्स घेतल्याने कालांतराने किडनीचे आजार होतात. कारण प्रोटीन मेटाबोलिसम झाल्यानंतर ब्लड युरिया नायट्रोजन नावाचा टाकाऊ पदार्थ तयार होतो. जो गाळून वेगळा करण्याचे कार्य किडनीचे असते. आणि हा टाकाऊ पदार्थ अधिक प्रमाणात तयार झाला तर किडनीवर अतिरिक्त कामाचा भार येतो. युरिया किडनीचे टाकाऊ पदार्थ गाळण्याच्या यंत्रणेत बिघाड करते आणि हा बिघाड पुन्हा भरून काढता येत नाही. म्हणून प्रोटीन घेण्याचे प्रमाण मर्यादीत ठेवा. तुमच्या शरीराच्या वजनाच्या १ किलोमागे ०.८ ग्रॅम प्रोटीन्स घेणे हे प्रोटीन्स घेण्याचे योग्य प्रमाण आहे. म्हणजेच जर तुमचे वजन ७० किलो असेल तर तुम्ही ५६ ग्रॅम प्रोटीन्स घ्यायला हवेत. खेळाडू, गर्भवती महिला, काही ठराविक आजार झालेल्या व्यक्तीमध्ये हे प्रमाण वेगळे असते. ते प्रमाण जाणून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
इन्फेकशनमुळे काही आजार झाले असल्यास: इन्फेशनमुळे होणाऱ्या आजारांचे स्वरूप सौम्य पासून गंभीर होत जाते. आणि त्याचा शरीरावर कोणत्यातरी प्रकारे परिणाम होतो. व्हायरल इन्फेकशनमुळे मलेरिया, लेप्टोपिरॉसिस, डेंग्यू असे आजार झाल्यास त्याचा परिणाम किडनीवर होतो. त्याचबरोबर अधिक प्रमाणात होणारे इंटर्नल ब्लिडींग किंवा शरीरात होणारी टॉक्सिन्सची निर्मिती यामुळे नेफ्रोटॉक्सिन ची परिस्थिती निर्माण होते. यामुळे सुद्धा किडनीवर परिणाम होऊ शकतो. Dr. Zope च्या सल्ल्यानुसार अशा पेशंटला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये भरती करून योग्य ट्रीटमेंट देण्याची गरज असते.
पेनकिलर्स घेणे: आपण सगळेच जाणतो की अती पेनकिलर्स घेण्याने किडनीवर परिणाम होतो. कारण ही औषधे किडनीकडून उत्सर्जित झाल्यावर त्याचे विघटन करण्याचे कार्य यकृताचे असते. आणि मग ते पचन नलिकेत सोडले जाते. अती प्रमाणात पेनकिलर्स घेतल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अगदी आवश्यक असेल तेव्हाच पेनकिलर्स घ्या. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या पेनकिलर्स देखील किडनीच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे त्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. विशेषतः जर मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पेनकिलर्स, औषधे घ्या.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock