किडनी विकार हा सायलेंट किलर असल्यामुळे त्याची लक्षणे लवकर लक्षात येत नाही. या विकाराचे निदान फार उशीरा होत असले तरी त्याची काही लक्षणे आधीपासून दिसून येतात. मात्र काही लक्षणे रोग बळावल्यावरच दिसून येतात. त्यामुळे किडनी विकारातील कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. कारण लक्षणे लवकर समजल्यास या विकारावर योग्य उपचार करता येऊ शकतात.
यासाठी जाणून घ्या किडनी विकाराची ही १४ लक्षणे-
१.यूरीनरी अथवा मूत्रपिंडाच्या कार्यातील बदल-
वारंवार लघवीला होणे व लघवीचे प्रमाण बदलणे हे किडनी विकाराचे प्रमुख लक्षण आहे.
- लघवीचे प्रमाण वाढणे अथवा कमी होणे
- नेहमीपेक्षा गडद रंगाची लघवी होणे
- लघवी आल्यासारखी वाटणे पण लघवी न होणे
रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याच्या प्रमाणात वाढ होणे अथवा कमी प्रमाणात लघवीला जाणे.
पुण्याच्या Senior Consultant Nephrologist DaVita Dr. Avinash Ignatius यांच्या मते वारंवार लघवीला होणे हे गंभीर किडनी विकाराचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सुरुवातीला या लक्षणामुळे काही दुष्परिणाम होत नसले तरी या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका. कारण किडनी विकारातील इतर लक्षणे किडनीचे कार्य ८० टक्के कमी झाल्यानंतर शेवटच्या टप्यात दिसून येतात.
२.लघवी करताना वेदना होतात-
लघवी करताना दाब येतो व वेदना होतात. मूत्रमार्गातील इनफेक्शनमुळे हा दाह व वेदना जाणवतात. जर हे इनफेक्शन किडनीमध्ये पसरले तर त्यामुळे तुम्हाला ताप व पाठीमध्ये वेदना देखील जाणवू शकतात.
३.लघवीतून रक्त येणे-
लघवीतून रक्त येत असल्यास ही गंभीर बाब असू शकते. त्यामुळे असे लक्षण आढळल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. याबाबतीत तुमच्या डॉक्टरचा त्वरीत सल्ला घ्या.
४.लघवी करताना फेसाळणारी लघवी होणे-
मुंबईतील प्रसिद्ध नेफरोलॉजिस्ट डॉ.दीपा जयराम यांच्या मते रुग्णाच्या शरीरातील प्रोटीन गळून गेल्यामुळे लघवी फेसाळणारी होते हे देखील किडनी विकाराचे एक लक्षण आहे.
५.सूज येणे-
शरीरातील टाकाऊ व जास्तीच्या द्रवपदार्थांचा निचरा करणे हे किडनीचे महत्वाचे कार्य असते. जेव्हा हे कार्य करण्यास किडनी असक्षम ठरते. तेव्हा शरीरात हे टाकाऊ द्रवपदार्थ साठू लागतात. याबाबतीत डॉ दीपा यांच्या मतानूसार शरीरातील पाणी व मीठाचा निचरा न झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या पाय, घोटा, हात व चेहरा यावर सूज येते. या समस्येला oedema असेही म्हणतात.
६.अशक्तपणा व थकवा येणे-
किडनीमुळे इथ्रोप्रोटीन हे हॉर्मोन तयार होते ज्यामुळे शरीरातील लाल रक्त पेशींना ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत होते. किडनीच्या कार्यात अडथळा आल्यामुळे या हॉर्मोन्सची पातळी खालावते. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा अथवा थकवा येतो.
७.चक्कर येणे अाणि लक्षात ठेवणे कठीण जाणे-
अशक्तपणामुळे किडनी सोबत तुमच्या मेंदूला देखील ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो.ज्यामुळे चक्कर येणे,एकाग्र न होता येणे,लक्षात ठेवणे कठीण जाणे ही लक्षणे दिसू लागतात.
८.सतत थंडी वाजणे-
किडनी विकारातील अशक्तपणामुळे उबदार वातावरणातही थंडी वाजते.यामुळे थंडीभरुन ताप येऊ शकतो. खुप थकवा व दगदगीमुळे देखील हे लक्षण दिसून येते.
९.त्वचेवर रॅशेस व खाज येणे-
एखाद्या अॅलर्जीप्रमाणे त्वचेवर खाज व पुरळ आल्यामुळे किडनी विकार ओळखण्यात गोंधळ होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा किडनी विकार व किडनीचे कार्य बंद झाल्यास देखील शरीरावर पुरळ येते. मूत्रपिंडाचे कार्य बंद झाल्यामुळे रक्तातील टाकाऊ पदार्थ शरीरात साठतात ज्यामुळे त्वचेवर पुरळ व खाज येते.
१०.तोंडातून दुर्गंध येणे व चव खराब होणे-
किडनीचे कार्य बिघडल्यामुळे रक्तातील युरीयाचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे तोंडातून दुर्गंध व चव जाण्याची समस्या होते.
११.मळमळ व उलटी-
शरीरात टाकाऊ द्रवपदार्थ साचल्याने मळमळ व उलटी होते.
१२.भूक कमी लागते-
शरीरात विषद्रव्ये व टाकाऊ पदार्थ साचल्याने काहीजणांना या विकारात भूक लागत नाही. डॉ दीपा जयराम यांच्या मते किडनी विकारातील लक्षणे लगेच समजत नाहीत. पण शरीरातील टाकाऊ पदार्थांचा निचरा न झाल्यामुळे तुम्हाला भूक कमी लागत आहे हे किडनी विकाराचे लक्षण ओळखणे सोपे असू शकते.
१३.श्वास घेताना धाप लागणे-
किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे फुफ्फुसांमध्ये द्रवपदार्थ साठू लागतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते. अॅनीमियामुळे शरीरासाठी लागणारे पुरेसे ऑस्किजन देखील कमी होते. त्यामुळे देखील श्वास घेताना धाप लागते.
१४.पाठ दुखणे-
काही रुग्णांमध्ये किडनी विकारामुळे पाठी पासून मांड्यांच्या सांध्यापर्यत वेदना होतात.हे लक्षण किडनीच्या अनेक समस्येमध्ये आढळू शकते.
- किडनी स्टोन
- पोलिस्टीक किडनी डिसिस
- Interstitial cystitis
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock