दिवाळीचा सण जसा प्रकाशाचा, झगमगाटाचा तसाच गोडा-धोडाच्या खाण्याचा. दिवाळीदरम्यान गोड- तिखट फराळाची रेलचेल असते. आप्त मंडळींकडे, मित्र-मैत्रिणींकडे मेजवानीची धूम असते. अशात डाएटचं गणित कोलमडतं आणि आरोग्यास घातक असे अनेक पदार्थ अतिप्रमात शरीरात जातात. मधूमेहींना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पथुपाण्याबाबत कायमच दक्ष राहणं गरजेचे असते. पण मग त्यासाठी दिवाळीसारख्या आनंदाच्या सणावर विरजण घालायची काहीच गरज नाही. दिवाळीचा आनंद घेत मधूमेहींनी या काही खास टीप्स लक्षात ठेवल्यास त्यांचा सणही अधिक आनंदात नक्कीच जाऊ शकतो.
1.डाएबेटीक डाएटचे कार्डिनल रुल्स विसरू नका -
मधूमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे पथ्यपाणी सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. सेवन हिल्स हॉस्पिटल्स, मुंबई येथील डाएबेटॉलॉजिस्ट डॉ. प्रदीप गाडगे यांच्या सल्ल्यानुसार, मधूमेहींनी काय खावे, केव्हा खावे, काय खाऊ नये आणि किती खावे या आहाराबाबत चार गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात. मैदा, रिफाईन्ड साखरेचे पदार्थ आहारातून अवश्य टाळावेत.त्यामुळे विकतचा फराळ टाळावा. विकत घेण्याची वेळ आल्यास त्यावरील लेबल नीट वाचून शक्यतो शुगर फ्री पदार्थांची निवड करावी.
2.गोडाचे पदार्थ घरीच बनवा -
वेळेअभावी आजकाल विकतचा फराळ घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र त्यामधील साखर-तूपाचा अति समावेश रक्तातील साखर झटकन वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे किमान आवडीचे आणि गोडाचे पादार्थ घरच्या घरीच बनवा. त्यामुळे शुगर फ्री गोडाचे पदार्थ किंवा त्यांचे आरोग्यदायी प्रमाण सेवन करता येऊ शकते.
3.योग्य प्रमाण विसरू नका -
सणाच्या दरम्यान गोडाच्या पार्थांचा आग्रह होणं स्वाभाविक आहे. मात्र त्याला योग्यवेळीच नाही म्हणायला शिका. पटकन नाही म्हणता येत नसल्यास फराळाचे पदार्थ मित्रांमध्ये,आप्तांमध्ये वाटून खा. तसेच गोडाचे पदार्थ साठवून ठेऊ नका. ते तुम्हांला डोळ्यांसमोर दिसल्यास खाण्याची इच्छा अधिक वाढते.
4.रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासा –
दिवाळीची धामधूम खूप असल्याने अनेकदा स्वतःकडे लक्ष दिलेजात नाही. त्यामुळे रक्तातील साखरेवर लक्ष न ठेवणे हे धोकादायक ठरू शकते. तुमच्या आसपासच्या व्यक्तींना तुमच्या मधूमेहाच्या आजाराबाबत माहिती द्या.
5.जेवणाऐवजी गोडाचे पादर्थ किंवा मिठाई खाणं टाळा –
दिवाळीत मिठाई आणी गोडाच्या पदार्थांची रेलचेल असते त्यामुळे कधीही, केव्हाही गोड पदार्थ खाल्ले जातात. काही वेळेस अति खाल्ल्याने पोट भरते आणी जेवण टाळले जाते. मात्र मिठाई ही ब्रेकफास्ट, जेवण यांना पर्याय असू शकत नाही. त्यामुळे गोडाचे पदार्थ प्रमाणातच खावेत.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock