अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ! नवरात्रीचे उपवास संपल्यानंतर आज सर्वत्र कोजागिरीची रात्र जागवली जाते. या रात्री दूध चंद्राच्या प्रकाशकिरणात उकळून त्याचा आस्वाद घेतला जातो. सोबतीला गप्पा आणि मजा-मस्तीतर असतेच. परंतू आपल्या प्रत्येक सणामागे एक आरोग्यदायी महत्त्व दडलेले असते. कोजागिरीच्या रात्रीचेही असेच आरोग्यदायी महत्त्व उलगडून सांगितले आहे शीव आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यलय येथील प्रोफेसर वैद्य रजनी पाटणकर यांनी -
प्रकोप काळ -
कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूत साजरी केली जाणारी पौर्णिमा. निसर्गात होणार्या बदलांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असतो. शरद ऋतू हा प्रकोप पित्ताचा काळ म्हणून ओळखला जातो. या दिवसांत निसर्गाप्रमाणेच शरीरातही उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते. परिणामी मानवी आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. आयुर्वेदात शरद ऋतूला आजारांची माता समजली जाते. या काळात शरीरात आजार जडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे आहे. ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी !
कोजागिरी पौर्णिमा -
शरद ऋतूमध्ये मानवी आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच नवरात्रीत व्रत-वैकल्यांचा सल्ला दिला जातो तर त्यानंतर येणार्या पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. निसर्गासोबतच शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता चंद्र- चांदण्यांच्या शीतल छायेमध्ये आहे. म्हणूनच या दिवशी चंद्राच्या छायेमध्ये अधिकाधिक वेळ राहण्याचा सल्ला दिला जातो.
दुधातील थंडावा -
दुध हे नैसर्गिकरित्या थंड प्रकृतीचे आहे. त्यामुळे चंद्राच्याप्रकाशाच्या सानिध्यात दूध आटवून पिण्याची संकल्पना पुढे आली. चंद्र-चांदण्याची शीतलता आणि दुधाचा थंडावा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. ( नक्की वाचा - हळदीचे दूध प्या आणि या ’7′ समस्यांना दूर ठेवा)
कोजागिरीचे मसाले दूध कसे बनवाल ?
मूळतः केवळ चंद्रप्रकाशात दूध आटवून पिणे आणि चंद्र-चांदण्याची सावलीत राहणे. हा कोजागिरीमागील मूळ हेतू आहे. परंतू आजकाल दुधाची चव वाढवण्याची त्यात सुकामेवा मिसळून मसालेदूध बनवले जाते. परंतू काजू-बदाम उष्ण प्रकृतीचे असल्याने त्याचा वापर प्रमाणात करावा. बेदाणा थंड असले तरीही आंबट असल्याने दूध नासण्याची शक्यता असते. परंतू केशर हे थंड आणि आरोग्यदायी असल्याने त्याचा जरूर वापर करावा. मधूमेहींनी या दुधात साखरेचा वापर टाळावा. हे ’5′ गैरसमज दूर करून बिनधास्त प्या दूध !
जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘ जीवेत शरद शतम’ असा आशिर्वाद दिला जातो. म्हणजेच तुमचे शरीर इतके रोगप्रतिशामक बनवा की तुम्ही आयुष्यात 100 शरद ऋतू पाहू शकाल. म्हणूनच जर तुम्ही दरवर्षी शरद ऋतूत निरोगी राहिल्यास वर्षभर आजारापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच आजच्या कोजागिरी सोबतच या ऋतूत निरोगी राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्या.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock