कृष्ण जन्माच्या उत्सवानंतर दहीहंडी फोडण्याचा खेळ रंगतो. पूर्वी उत्सवाच्या स्वरूपात असलेली दहीहंडी आज स्पर्धा आणि खेळात बदलू लागली आहे. विशिष्ट उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचला जातो आणि त्याला फोडण्यासाठी अनेक पथक दहीहंडीचा थरारक खेळ खेळतात.
दहीहंडी फोडण्यासाठी पथक जितकी कसून तयारी आणि प्रयत्न करतात तितकाच हा खेळ बघणार्यांसाठीदेखील एक विलक्षण अनुभव असतो. 2012 साली जोगेश्वरी, मुंबई येथील ‘जय जवान’ पथकाने 9 थरांचा मानवी मनोरा रचून विश्वविक्रम केला. भारतात अशाप्रकारे झालेल्या विश्वविक्रमाची ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने देखील दखल घेतली.
(छायाचित्र सौजन्य – Jai Jawan Govinda pathak / Facebook account)
शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरा यशस्वीपणे रचने आणि उतरवणे हे ‘जय जवान’ गोविंदा पथकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळेच गेली चार वर्ष ‘जय जवान’ पथक यशस्वीरित्या 9 थरांचा मानवी मनोरा रचू शकतो. क्षणाक्षणाला हृद्याचा ठोका चुकवणारा दहीहंडीच्या खेळामागे असलेली मेहनतही तितकीच महत्त्वाची असते. याच खास तयारी बद्दल ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सागर कुणकवळेकर या फीटनेस एक्सपर्टने दिलेली त्यांची खास डाएट आणि फीटनेस सिक्रेट्स !
- ‘जय जवान’ पथकाचा खास फीटनेस -
दहीहंडीमध्ये मानवी थर लावताना पाय, कंबर आणि खांदे या तीन भागांवर विशेष ताण येतो. त्यामुळे त्यांना मजबूत ठेवणे गरजेचे असते. सागरच्या सांगण्यानुसार, जय जवान गोविंदा पथकाची तयारी दहीहंडीच्या आधी सुमारे अडीच ते तीन महिने आधीपासून सुरू होते. सुरवातीच्या दिवसामध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी 15 -20 दिवस प्रयत्न केले जातात. यामध्ये तासाभराचे जॉगिंग आणि रानिंगचा समावेश असतो. यासोबत काही वर्कआऊट दिले जातात. ( नक्की वाचा -पावसाळ्यात ‘जॉगिंग’ करताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा)
मुलांमध्ये स्टॅमिना तयार झाल्यानंतर बॅक मसल्स आणि लेग मसल्स मजबूत करण्यावर सागरचा भर असतो. त्यासाठी कार्डियो व्यायाम दिला जातो. यामुळे कोअर मसल्स मजबूत होण्यासाठी मदत होते. ग्राऊंडवर आल्यानंतर ‘जय जवान’ पथकाच्या मुलांना लंजेस, पूल अप्स, स्वॉट यासारखे व्यायाम दिले जातात. तसेच रोप लावून व्यायाम करण्याच्या सवयीने पोटाजवळचे कोअर मसल्सदेखील मजबूत केले जातात.
- डाएटच्या खास टीप्स -
व्यायामासोबतच डाएटवरही प्रामुख्याने लक्ष ठेवले जाते. शारिरीक कसरतीच्या या खेळामध्ये शरीरात पाणी मुबलक प्रमाणात राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. आहारात प्रोटीनचा समावेश योग्य राहण्यासाठी हिरवे मूग, मांसाहार्यांसाठी मासे आणि अंड्याचा पांढरा भाग खाण्याचा सल्ला दिला जातो.
- दहीहंडीच्या दिवशी डाएट कसे पाळले जाते ?
दहीहंडीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी उन्हांतून फिरताना मुलांना डीहायड्रेशनचा त्रास होऊ नये. याकडे सारे लक्ष असते. त्यामुळे पाण्याचा आणि फळांचा समावेश केला जातो. जेवणासोबतच प्रत्येकाला केळं आणि सफरचंद ही फळ आवर्जून दिली जातात.
- अपघातापासून दूर राहण्यासाठी काय प्रयत्न केले जातात ?
दहीहंडी हा खेळ थरारक असल्याने त्याच्यासोबत असलेले अपघातही तितकेच काळजीचे असतात. मात्र गोविंदांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठीच अडीच महिन्यांची मेहनत घेतली जात असल्याचे सागर सांगतो. शरीर मजबूत करण्यासाठी स्नायूंना बळकटी देण्यासाठी खास व्यायाम केले जातात. त्याचबरोबर ताडासन, नौकासन यासारख्या योगासनांचा प्रामुख्याने सराव केला जातो.