3 मे 2016 – जागतिक अस्थमा दिवस
श्वसनमार्गामध्ये दोष निर्माण झाल्याने अस्थमाचा त्रास निर्माण होतो. वातावरणातील प्रदूषक, धूळ यामुळे अॅलर्जी वाढते. श्वास घेताना अॅलर्जीला कारणीभूत ठरणारे घटक शरीरात जातात. यामुळे खोकला, छाती चोंदणे, श्वास घेताना त्रास होणे, खोकला अशी लक्षण आढळून येतात. अस्थमापासून कायमस्वरूपी सुटका मिळवणे शक्य नसले तरीही विशेष काळजी घेतल्यास जीवन आनंदाने जगणे शक्य होते. नक्की वाचा : ‘दम्या’चा त्रास दूर करणारे ‘५’ घरगुती उपाय !
अस्थमावर नियंत्रण मिळवण्यासाठी या 10 परिस्थितींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
- धूळ
धूळीमधील अॅलर्जी वाढवणारे घटक अस्थमांच्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकतात.त्यामुळे घरात कटाक्षाने स्वच्छता पाळा. धूळ साचून राहणार नाही.याची काळजी घ्या. तसेच स्वच्छता करताना व्हॅक्युम क्लिनरचा वापर करा.
- फूलं
फूलांमधील परागकणदेखील अस्थमाचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. घरात झाडं लावणंदेखील अशा रुग्णांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे झाडांना अतिपाणी घालणे टाळा. तसेच कुंड्या सूर्यप्रकाशात ठेवा. सुकलेला कचरा ताबडतोब काढा.
- पाळीव प्राणी
कुत्री, मांजरीचा वावर अस्थमाच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकतो.त्याचे केस,लाळ आणि त्वचेशी आलेला संपर्क अस्थमाचा त्रास वाढवू शकतो. असे काही संशोधनातून समोर आले आहे. कुत्री मांजरी जवळ नसले तरीही त्यांचे केस वातावरणात दोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात.
- किचनमधील वास आणि धूर
अन्न पदार्थ बनवताना होणारा धूर आणि मसाल्यांचा, फोडणीचा वास अस्थमाच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकतो. किचनमध्ये एक्झॉस फॅन किंवा चिमणी नसेल तर किमान खिडक्या उघड्या ठेवा.म्हणजे वास खोलीत राहणार नाही.
- धूम्रपान
सिगारेटमधील धूर आणि घातक पदार्थ फुफ्फुसांचे नुकसान करतात. या व्यसनामुळे अस्थमा होण्याचा धोका वाढतो. सिगारेटच्या धुरामुळे खोकला वाढतो. धुम्रपान करणार्या गर्भवती स्त्रियांच्या नवजात बालकांचे श्वसनकार्यदेखील कमजोर होते.धुम्रपानामुळे होतात सेक्सलाईफवर गंभीर परिणाम ! हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
- दाहशामक औषध
अॅस्प्रिन, नॉन स्टिरॉईडल दाहशामक औषधं अस्थमाचा त्रास वाढवतात. त्यामुळे डॉक्टरांकडून उपचार घेताना औषधं सुचवण्यापूर्वी तुम्हांला अस्थमाचा त्रास असल्याची माहिती त्यांना द्या. म्हणजे त्यानुसार औषधोपचार सुचवले जातील.
- व्यायाम
फार कष्टाचे व्यायाम प्रकार करताना श्वसनाचा त्रास होतो. धाप लागल्याने श्वसनकार्य बिघडते. नाकाद्वारे घेतली जाणारे हवा गरम आणि मॉईस्ट होते. त्यानंतर शरीरात जाते. मात्र व्यायाम करताना श्वास तोंडाद्वारे घेतला जातो.यामुळे शरीरातअधिक थंड आणि शुष्क हवा घेतली जाते. परिणामी श्वसनमार्गातील तापमानात अचानक बदल होतो.परिणामी श्वासनलिका आकुंचन पावतात.
- मानसिक बदल
भीती, राग,काळजी अशा तणाव वाढवणार्या भावना हृद्याचे ठोके आणि श्वासावरील नियंत्रण गमावतात. श्वास नियंत्रणाबाहेर गेल्यास श्वासनलिका आकुंचन पावतात परिणामी अस्थमाचा अॅटॅक येतो.
- फूड अॅलर्जी
अंड, गाईचे दूध, शेंगदाणा, सोयाबीन, मासे अशा पदार्थांची काही जणांना अॅलर्जी होऊ शकते. याचा आहारात अतिप्रमाणात समावेश आल्यास अस्थमाचा त्रास वाढू शकतो.