‘दार उघड बये’ म्हणत महाराष्ट्राचा काना-कोपरा पिंजून काढणारे ‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकरांना कडू दूधीचा रस पिणे फारच त्रासदायक ठरला. दैनंदिन आहाराचा एक भाग म्हणून गेल्या शुक्रवारी (18 डिसेंबर) सकाळी आदेश बांदेकरांनी दूधीचा रस घेतला. पण काही वेळातच त्यांना अवस्थ वाटू लागले. उलट्या, जुलाब आणि शरीराला घाम आल्याने त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी त्यांना हिरानंदनी रुग्णालयात तात्काळ दाखल केले. मात्र तेथे त्यांना रक्ताची उलटी झाल्याने तात्काळ आसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले. तब्बल 48 तास अत्यवस्थ असलेले आदेश बांदेकर आता सुखरूप घरी परतले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.
- बहूपयोगी ‘दूधी रस’ विषारी कसा ठरू शकतो ?
काकडीच्या जातीतील दूधी भोपळा ही फळभाजी युरीन इंफेक्शन, मधूमेह, हृद्यविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. वजन घटवण्यासाठी हा रस अनेकजण आहारात घेतात. (नक्की वाचा: परिणामकारक वजन घटवतील ही ’15′ घरगुती ड्रिंक्स !! ) पण काही वेळेस दूधीची लागवड केल्यानंतर त्यातील काही विषारी, कडवट बियांमूळे दूधी कडू होतो. अशा दूधीचा रस पिणे विषारी ठरू शकतो.
- कसा ओळखाल हा धोका ?
ज्याप्रमाणे एखादी काकडी कडवट निघते. तसाच दूधीदेखील कडू निघू शकतो. मात्र तो शरीरासाठी विषारी आणि प्रामुख्याने जीवघेणा ठरतो. त्यामुळे कच्च्या दूधीचा रस किंवा भाजी करण्यापूर्वी त्याचा छोटा तुकडा चावून बघा. तो कडवट वाटल्यास त्याचा वापर टाळा. नेहमीच्या चवीचा दूधी हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
- कसा कराल दूधीचा रस ?
दूधी स्वच्छ धुऊन चिरून कोमट पाण्यात ठेवा.
त्यानंतर ते तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाऊन त्यात आलं, लसूण, जिरं,मीठ मिसळून रस करा. व तो गाळून प्या.
- खबरदारीचा उपाय – :
- दुधीचा रस आरोग्यासाठी अत्यंत हितकारी आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे नियमित सेवन करणे फायदेशीरच ठरेल. पण केवळ औषध म्हणून सारा एकाच वेळी गिळून टाकण्याऐवजी हळूहळू प्या.
- कडू दूधी आहारात पूर्णपणे वर्ज्य करा.
- दूधी रसासोबत कारलं, गाजर, भेंडी अशा इतर भाज्यांचा रस मिसळणे टाळा.
- अशा प्रकारचा रस प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यास, उलट्या, जुलाब, पचनमार्गात बिघाड झाल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात त्या व्यक्तीला दाखल करा.
- अशा विषबाधेवर ठोस उतारा नाही मात्र काही वैद्यकीय उपचारांनीच रुग्णाच्या जीवावरचा धोका टाळता येऊ शकतो.
सौजन्य - डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
छायाचित्र सौजन्य -: फेसबूक