आजकाल निरोगी स्वास्थ्याकडे लक्ष देण्यापेक्षा केवळ ‘वजन घटवणे‘ हा अनेकांच्या फीटनेसचा हेतू बनत चालला आहे. फसव्या जाहिरातींचा भडीमार आणि आहारशास्त्राबद्दल अपुरी आणि चुकीची ( किंबहुना अफवाच जास्त) माहिती लोकांमध्ये अधिक असल्याने आंधळेपणाने फॉलो केले जाणारे डाएट प्लॅन वजन घटवण्यापेक्षा वाढवतातच जास्त ! अशाच काही समज-गैरसमजांना येणार्या नव्या वर्षात दूर करण्यासाठी पाळा या सेलिब्रिटी डाएटीशन ऋजुता दिवेकरच्या खास टीप्स -:
जून ते सोनं -:
आजकाल मसाला चहाची जागा ‘ग्रीन टी‘, तांब्यांची भांडी ( नक्की वाचा :तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे )आणि पितळ्याच्या तवा, कढईची जागा नॉनस्टिक भांड्यांनी घेतली आहेत. याचा परिणाम आपल्या शरीरावर झपाट्याने होत आहे. लाईफस्टाईलमध्ये झालेले हे बदल अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे शक्य तितक्या पारंपारिक पद्धतीचा आजही जीवनशैलीत समावेश करा. टेट्रापॅकमधील दूधापेक्षा डेअरी मिल्क दुधाचा आहारात समावेश करा. जेवणात घरगुती दही, तूपाचा समावेश करा. आरोग्यासोबतच तूपामुळे सौंदर्यही सुधारते. वेळेवर आणि शक्यतो घरच्या जेवणाचा /नाश्त्याचा आहारात समावेश करा.
- फळं / भाज्या-
एक्झॉटिक फळ किंवा भाज्यांपेक्षा आपल्या घरात आणि आहारात पूर्वपार चालत आलेल्या फळं आणि भाज्यांचा अधिकाधिक समावेश करा. तसेच ऋतूमानानुसार उपलब्ध होणार्या फळांचा, भाज्यांचा त्याच हंगामात पुरेसा आनंद घ्या. यामुळे ऋतूमानात होणार्या बदलांचा आरोग्यावर थेट परिणाम होत नाही. तसेच त्यामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. जांभूळ, बोर आणि फणस या आजकाल हळूहळू बाजारातून गायब होत जाणार्या फळांचा योग्य हंगामात जरूर आस्वाद घ्या.
2. तेलं -
तेलामुळे फॅक्ट्स वाढतात. परिणामी हृद्यरोग, रक्तदाब वाढतो अशा गोष्टींचे भांडवल करून काही तेल कंपन्या जाहिराती बनवतात. अशा जाहिरातींना भूलून तेलाची निवड करण्यापेक्षा तुमच्या खाद्यसंस्कृतीनुसार शेंगदाणा, मोहरी किंवा खोबरेल तेल यापैकी तेलाचा वापर करा. खोबर्यामुळे कॉलेस्ट्रेरॉल वाढते हा निव्वळ गैरसमज आहे. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी, पदार्थांमधील ग्लायसमिक इंडेक्स प्रमाणात राखण्यासाठी भाजीत, डाळीत खोबर्याचा अवश्य समावेश करा. इडली / डोश्यासोबत खोबर्याची चटणी अत्यावश्यक आहे. यामुळे इडली, डोशासारख्या पदार्थांमधून मिळणारी पोषकद्रव्यं शरीरात शोषून घेण्यास मदत होते.
3. धान्य -
डाळीचा, तांदळाचा आहारात समावेश करा. रात्रीच्या वेळेस भात टाळणे हे चूकीचे आहे. त्यामुळे आपल्याला फायबर्सचा पुरवठा होतो. तसेच व्हिटामिन बी 6 चा तांदळातून शरीराला पुरवठा होतो. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते,पिसीओडीजचा त्रास कमी होतो. आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा योग्य समावेश करा. ज्वारी उन्हाळ्यात, बाजरी हिवाळ्यात तर नाचणी प्रामुख्याने पावसाळा व हिवाळ्यात खाणे आरोग्यदायी ठरते.
4. प्रोटीन्स –
शरीराची प्रोटीन्सची गरज भागवण्यासाठी बाजारात मिळणारी विकतची ‘प्रोटीन’ सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा मेतकूटभात, वरणभात, खिचडी,पोहे यांचा आहारात समावेश करा. साबुदाण्यामधून शरीराला ओमेगा 3, ओमेगा6, आणि ओमेगा 9 यांचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे उपवास करत असाल किंवा नसाल पण आठवड्यातून एकदा साबुदाण्याच्या खिचडीचा अवश्य आनंद घ्या.
आहारातील पथ्यपाण्याबरोबरच व्यायामदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. दिवसभरातील व्यस्त कामाच्या वेळांमुळे जीम करणे शक्य होत नाही.अशावेळी अनेकजण चालायला जातात. पण मूळात चालणे हा व्यायाम नसून ती केवळ एक अॅक्टव्हीटी आहे. त्यामुळे योग्य तज्ञांच्या हाताखाली योगाभ्यास किंवा काही रंजक अॅक्टीव्हिटीतून वजन आटोक्यात ठेवण्यासोबतच स्वास्थ्य सुधारण्याकडे लक्ष द्या.
छायाचित्र सौजन्य – Facebook Account / Rujuta Diwekar