हायपरटेंशन हा एक सायलेंट किलर म्हणून ओळखण्यात येतो कारण अगदी उशीर होईपर्यंत या आरोग्य समस्येची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.तसेच यामागची कारणे देखील ज्ञात नसल्यामुळे या स्थितीचे वेळीच निदान करणे कठीण जाते.या कारणांमुळेच फक्त नियमित हेल्द चेक-अप दरम्यान डॉक्टरांकडे गेल्यावरच उच्चरक्तदाबाचे निदान होऊ शकते.तसेच उच्चरक्तदाबाची औषधं नियमित घेऊनही अचानक रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.यासाठी हायपरटेंशनचे तुमच्या शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात हे अवश्य वाचा.
मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे Senior Cardiac Electro Physiologist डॉ.संतोष कुमार डोरा यांच्याकडून जाणून घेऊयात अचानक वाढणा-या रक्तदाबाची ही चार कारणे व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नेमके काय करावे ?
रक्तदाब वाढण्याची कारणे-
१.जर तुम्ही औषधे घेणे बंद केले तर-
रक्तदाब वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे न घेणे.असे आढळून आले आहे की या समस्येवर ५ पैकी एका व्यक्तीवर उपचार करण्यात येतात व त्यापैकी फक्त ५ टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात असतो.त्यामुळे जर तुम्हाला उच्चरक्तदाबाची समस्या असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर औषधे घेणे गरजेचे आहे.तसेच काही रुग्ण त्यांना सांगण्यात आलेल्या डोसपेक्षा कमी क्षमतेचा डोस घेतात.उदा.जर एखाद्या रुग्णाला डॉक्टरांनी १० मिग्रॅचा डोस घेण्यास सांगितला असेल तर रुग्ण ५ मिग्रॅचा डोस घेतात.ज्यामुळे त्यांना रक्तदाब नियंत्रणात ठेवणे कठीण जाते.लक्षात ठेवा तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा ठराविक डोस नियमित न चुकता घेणे गरजेचे आहे.असे असले तरी काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाचा रक्तदाब कमी अथवा नॉर्मल झाल्यामुळे डॉक्टर त्याच्या औषधांचा डोस कमी करतात.नॉर्मल रक्तदाब असणा-या लोकांना दीर्घकाळ व सक्तीच्या देखदेखीची गरज असू शकते.
२.जर तुम्ही डायटचे नियम सक्तीने पाळले नाहीत तर-
तसेच अचानक रक्तदाब वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे आहाराबाबत काळजी न घेणे हे असते.जर तुम्ही भरपूर प्रमाणात मीठ व खारट पदार्थ खाल्ले तर तुमचा रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते.अति प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. रक्तवाहिन्या जाड व अरुंद होतात ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात.यामुळे केवळ रक्तदाब वाढतो असे नाही तर यामुळे शरीरातील अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने त्यांना ऑक्सिजन व पोषणमुल्ये देखील अपु-या प्रमाणात मिळतात.यासाठी हायपरटेंशन असलेल्या लोकांनी लोणची,पापड,चिप्स सारखे फास्टफूड खाणे कटाक्षाने टाळले पाहिजे.रेडमीट सारखे फॅटा पदार्थ व अल्कोहोल घेणा-या लोकांना देखील हायपरटेंशची समस्या होण्याचा धोका असतो.यासाठी जाणून घ्या हायपरटेंशनचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील ही १० फळं आणि भाज्या
३.जर तुम्ही इतर समस्येवरील औषधे घेतल्यामुळे ड्रग इंटरॅक्शन झाले तर-
हायपरटेंशनवर औषध घेताना जर तुम्हाला इतर आरोग्य समस्या जसे की सर्दी-खोकल्यावरील औषधे घ्यावी लागणार असतील तर याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.कारण काही औषधांमुळे हायपरटेंशवरील औषधांचा प्रभाव वाढू अथवा कमी होऊ शकतो.उदा.सर्दीवरील काही औषधांमधील घटकांमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.जर तुमचा रक्तदाब कमी अथवा नॉर्मल असेल तर यामुळे तुम्हाला धोका नसतो पण हायपरटेंशनची समस्या असल्यास या औषधांमुळे तुमचा रक्तदाब अधिक वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी अशा स्थितीमध्ये तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानूसार औषधे घ्या.तसेच उच्च रक्तदाबासंबधीचे हे १० गैरसमज आजच दूर करा.
४.जर तुम्हाला रक्तदाब वाढविणारे आजार असतील तर-
अनेक लोकांना हे माहित नसते की उच्चरक्तदाबाचा त्रास एखाद्या विकारामुळेही होऊ शकतो.जर तुम्हाला किडनी विकार असतील व तुम्ही त्यावर योग्य उपचार केले नाहीत तर तुमचा रक्तदाब अचानक वाढू शकतो.तसेच जर तुम्हाला bilateral renal artery stenosis समस्या असेल तरीही तुमचा रक्तदाब अचानक वाढू शकतो.या आजारावर वेळीच उपचार न केल्यास हार्ट फेल होण्याची शक्यता असते.pheochromocytoma या समस्येमुळे देखील रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते.ही एक इंडोक्राइन स्थिती असून या स्थितीमध्ये अॅर्डनल ग्रंथीमधील ट्यूमर मुळे adrenaline व noradrenaline या दोन हॉर्मोन्सची निर्मिती अतिप्रमाणात होते.तसेच या हॉर्मोन्सच्या अतिनिर्मिती मुळे रक्तदाब देखील वाढतो.यासाठी उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखणे किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो का ?हे जरुर जाणून घ्या.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock