जोडीदाराचा मृत्यू ही जीवनातील एक फार दु:खद घटना असते.या घटनेमुळे तुम्ही जीवन जगण्याचा आनंदच गमावून बसता.जोडीदारानंतर तुम्हाला आधार देणारी सासरची व माहेरची अनेक माणसे तुमच्या जीवनात असली तरी जोडीदाराची कमतरता कोणीच भरुन काढू शकत नाही.जोडीदार गमावल्याचे दु:ख कितीही असह्य असले तरी कालांतराने त्यातून बाहेर पडणे देखील तितकेच गरजेचे असते.यासाठी Vandrevala Foundation चे Executive vice president डॉ.अरुण जॉन यांच्याकडून जाणून घेऊयात जोडीदाराच्या मृत्यूनंतर स्वत:ला कसे सांभाळाल.
या दोन परिस्थितीतून तुम्हाला जावे लागू शकते.
१.अपेक्षित मृत्यू- अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला जोडीदार जाणार असल्याची कल्पना आलेली असल्याने स्वत:ला सांभाळणे सोपे जाते.मात्र ज्या लोकांचे जोडीदार एखाद्या दुर्धर आजाराला दीर्घ काळ झुंज देऊन जातात त्यांना या जरी परिस्थितीची कल्पना असली तरी दु:खाची तीव्रता मात्र तशीच कायम राहते.शक्य असल्यास एखाद्याला जीवनदान देण्यासाठी व अवयव रुपात जोडीदाराला जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचे अवयव दान करा.
२.अचानक मृत्यू- या परिस्थितीमध्ये मात्र जोडीदाराच्या जाण्याने त्या व्यक्तीला फार मोठा धक्का बसू शकतो.अचानक झालेल्या विरहामुळे त्या व्यक्तीला शारिरीक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा जोडीदाराला या घटनेनंतर चक्कर,मळमळ,ह्रदयाचे ठोके वाढणे,भय व चिंतेला सामोरे जावे लागते.त्यामुळे या परिस्थितीतून पुन्हा पुर्ववत होण्यास फार कालावधी लागू शकतो.डॉ.जॉन यांच्यामते जर त्या जोडीदाराच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असेल तर हा त्रास अधिकच गंभीर असू शकतो.
जोडीदाराच्या मृत्यूनंतर काय घडते.
- जोडीदाराच्या जाण्याच्या दु:खासोबतच त्याच्याशिवाय जीवन जगण्याचा संघर्ष देखील त्याच्या जोडीदाराला भोगावा लागू शकतो.
- अशा परिस्थितीत मागे राहीलेल्या जोडीदाराला त्याच्या घरच्या जबाबदा-या एकट्याने पेलाव्या लागतात.पूर्वी या जबाबदा-या दोघेही वाटून घेऊन करीत असत.त्यात जर ती व्यक्ती कमावती नसेल तर या जबाबदा-या पेलवणे कठीण जाऊ शकते.
- जर एखाद्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर तिच्या पतीला घर व नोकरी या दोन्ही जबाबदा-या सांभाळाव्या लागतात.मुलांना भावनिक आधारासाठी आईची सवय झालेली असते त्यामुळे अचानक आई व वडील या दोन्ही जबाबदा-या सांभाळणे त्या जोडीदारासाठी कठीण जाते.
- जर त्यांचे मुल फारच लहान असेल तर त्या बाळाला मृत्यूबाबत समजावून सांगणे त्याच्यासाठी फार त्रासदायक असू शकते.
- तुमच्या परिस्थितीचा लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करु शकतात.इन्सुरन्सवाला व वकील घरी भेट देतात.
जोडीदाराच्या मृत्यूनंतर स्वत:ला कसे सांभाळाल.
- स्वत:चे दु:ख समजावून घ्या- कुबलर-रॉस मॉडेलच्या मते प्रत्येकाला आयुष्यात दु:खाच्या पाच टप्पातून जावे लागते.यासाठी या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा.
- भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका-अशा परिस्थितीत दु:ख निवळण्याची वाट पहा.भावनेच्या भरात त्वरीत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.
- स्वत:ला त्रास करुन घेण्यापेक्षा मुलांचा विचार करा-तुमच्या मुलांना तुमची अधिक गरज असते.त्यामुळे तुमच्या भावनिक स्थितीचा तुमच्या मुलांवर परिणाम होत असतो.दु:ख कमी करण्यासाठी मुलांकडे मन मोकळे करा.
- भविष्याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची घाई करु नका-अशा परिस्थितीत आधी तुम्ही स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे.त्यामुळे लगेच भविष्याबाबत निर्णय घेण्याची घाई करु नका.आधी स्वत:ला सांभाळा.
- जोडीदाराच्या वस्तूंना कुरवाळत बसू नका- त्याची अथवा तिची एखादी आवडती गोष्ट घेऊन सतत दु:ख कुरवाळत बसू नका.जर तुम्हाला या वस्तू जपून ठेवायच्या असतील तर काहीच हरकत नाही पण त्यामुळे जर तुम्ही सतत रडत बसणार असाल तर त्यापेक्षा त्या गोष्टी एखाद्या गरजवंताला देऊन मोकळ्या व्हा.
- आठवण देणा-या दिवशी सत्कर्म करा- त्याच्या अथवा तिच्या वाढदिवशी अथवा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवण काढत दु:खी होण्यापेक्षा त्यांच्या नावे एखाद्या अनाथआश्रमामध्ये दान करा ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.
- दु:ख वाढवणा-या गोष्टींपासून दूर रहा- त्यांची आठवण करुन देणा-या गोष्टींपासून शक्य तितके दूर रहा.त्यापेक्षा तुमच्या जीवनातील त्यांच्या सहवासातील आनंदी घटना आठवून सुखी व्हा.
- तज्ञांची मदत घ्या-या घटनेमुळे तुम्हाला नैराश्य आले असेल तर एखाद्या चांगल्या तज्ञांची मदत घ्या किंवा एखाद्या नातेवाईकाकडे मन मोकळे करा.
आयुष्यात पुढे जाण्याचा विचार कोणी करावा?
जोडीदाराच्या आठवणींसह आयुष्य काढणे सुंदर असू शकते.पण आयुष्यभर एकटे रहाणे हे तितकेसे सोपे नक्कीच नाही.आर्थिक,भावनिक व सेक्शुअल गरजांसाठी तुम्ही आयुष्यात दुस-या व्यक्तीचा विचार करणे देखील तितकेच गरजेचे आहे.त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यास काहीच हरकत नाही.मात्र हा निर्णय तुमचा स्वत:चा असावा कोणाच्यातरी दबाव अथवा भितीखाली हा निर्णय मुळीच घेऊ नका.जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीसोबत आयुष्य घालवणे योग्य वाटू लागले तरी पुढील निर्णय घेण्यापूर्वी थोडी वाट पहा.सावधपणे व विचारपूर्वकच कोणताही निर्णय घ्या.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock