जरी कारल्याची भाजी तिच्या कडू चवीमुळे सर्वांच्याच नावडीची नसली तरी ही भाजी आरोग्यासाठी हितकारक असते.तुम्हाला ही भाजी आवडत असली अथवा नसली तरीही तिच्यामधील औषधी गुणधर्मांसाठी तिला तुमच्या आहारामध्ये जरुर समाविष्ट करा.तसेच जाणून घ्या भारतीय खाद्यसंस्कृतीत भोजनाची सुरुवात मसालेदार पदार्थांने तर शेवट गोडाने का केला जातो?
मग कारल्याचा अधिक चविष्ट पद्धतीने आहारात समावेश करण्यासाठी कशाप्रकारे समावेश करावा याकरिता या रेसिपी नक्की आजमावून पहा.
१.कारल्याची भाजी- आरोग्याला हितकारक असल्याने भारतामध्ये अनेकांच्या घरी पोळी व डाळ-भातासोबत कारल्याची भाजी केली जाते.
कृती-२५० ग्रॅम कारली स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून घ्या व त्यानंतर त्याच्या मध्यम आकारांच्या फोडी करा.तुम्ही त्याच्या गोलाकार चकत्या अथवा अगदी पातळ स्लाइस देखील करु शकता.दोन मध्यम आकाराचे कांदे घ्या व ते सोलून बारीक चिरुन घ्या.कढईमध्ये तेल गरम करा.गॅसची आच मंद ठेऊन तेलामध्ये जिरे व मोहरीची फोडणी द्या.जिरे व मोहरी तडतडू लागल्यावर त्यावर कांदा टाका व तो गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.त्यामध्ये कारल्याच्या फोडी टाका व त्याही चांगल्या परतून घ्या.त्यामध्ये मीठ,हळद,गरम मसाला,धणे पूड,लाल तिखट टाका व चांगले परतून घ्या.कढईवर झाकण ठेवा व काही मिनिटे भाजी वाफेवर शिजू द्या.भाजी तळाला लागू नये यासाठी अधूनमधून परतत रहा.भाजीमध्ये पाणी टाकू नका.कारले मऊ झाल्यावर त्यामध्ये आमचूर पावडर मिसळा व पुन्हा चांगले परतून घ्या.गॅस बंद करा व भाजीला कोथिंबीरीने गार्निश करा.हवे असल्यास तुम्ही या डीशमध्ये एक चमचा बदामाची पावडर देखील टाकू शकता.
२.मसाला कारले- कारल्याची भाजी चमचमीत करण्यासाठी ही एक दुसरी पद्धत देखील जरुर करा.
कृती- २५० ग्रॅम कारली स्वच्छ धुऊन त्याच्या छोट्या छोट्या फोडी करा.ही भाजी कुकरमध्ये क शिट्टी काढून शिजवून घ्या.लक्षात ठेवा ही भाजी कुकरमध्ये जास्त शिजवू नका कारण भाजी जास्त शिजली तर कारली मऊ होतील व त्याचे टेक्श्चर देखील निघून जाईल.त्यानंतर कढई अथवा पॅनमध्ये तेल गरम करा.त्या तेलात एक चिरलेला कांदा टाकून तो चांगला परतून घ्या.कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात बारीक चिरलेले आले व लसून टाका व ते चांगले मिक्स करा.संपुर्ण मिश्रण ब्राऊन रंगाचे झाल्यावर त्यात एक चिरलेला टोमॅटो टाका व तो चांगला शिजेपर्यंत परतून घ्या.त्या मिश्रणामध्ये मीठ,हळद,गरम मसाला,लाल तिखट व तुमच्या आवडीनूसार इतर मसाले टाका.त्यात उकडलेले कारले टाकून मिश्रण एकजीव करा.भांड्यावर झाकण ठेऊन कारले १० मिनीटे शिजू द्या.मसाले कारल्यामध्ये चांगले मुरल्यावर गॅस बंद करा व वरतून कोथिंबीर टाकून गार्निश केलेली भाजी गरम असतानाच सर्व्ह करा.
३.कारले फ्राय-तुम्हाला भाज्या आवडत असतील तर गरमागरम आमटी-भातासोबत कारले फ्राय देखील तुम्हाला नक्कीच आवडेल.तसेच कारले फ्राय सांबर-भात व कढी-भातासोबत देखील मस्त लागते.
कृती- २५० ग्रॅम कारली धुऊन व चिरुन घ्या.त्यामध्ये मीठ,हळद,गरम मसाला व लाल तिखट टाकून मिश्रण एकजीव करा. हवे असल्यास तुम्ही भाजी चिरण्यापूर्वी त्याची साले देखील सोलून घेऊ शकता.कढईत तेल गरम करा व त्यामध्ये चिरलेल्या कारल्याच्या फोडी टाका.मंद आचेवर कारले ब्राऊन रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.मध्ये मध्ये सतत परतत रहा.त्यामध्ये पुन्हा चिमुटभर मसाले व मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्या.कारले ब्राऊन रंगाचे झाल्यावर त्यावर बेसन अथवा चण्याच्या डाळीचे पीठ भूरभूरा व ते शिजेपर्यंत परतत रहा.गॅस बंद करा व लिंबू पिळून भाजी कोथिंबीरीने सजवा.
भरलेली कारली-
विशेष दक्षता घेत केलेली ही भाजी कारली न आवडणा-या लोकांना देखील नक्कीच आवडू शकते.
कृती- पाच ते सहा मध्यम आकाराची कारली घ्या.ती स्वच्छ धुऊन सोलून घ्या.कारल्यामध्ये उभी चिर पाडून त्यामधील बिया काढून टाका.सोललेल्या भागामध्ये मीठ मिसळा व बाजूला ठेऊन द्या.कारल्याला देखील मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवा.त्यानंतर कारली पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या ज्यामुळे त्यातील जास्तीचे मीठ व कडूपणा निघून जाईल.एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेल्या कांदा अर्धा टाका.परतलेल्या कांद्यामध्ये आले-लसूणाची पेस्ट टाकून दोन ते तीन मिनीटे शिजवा.मिश्रणाचा रंग लाइट ब्राऊन झाल्यावर कारल्याचे सोललेले मिश्रण टाकून आणखी थोडावेळ परता.त्यामध्ये आमचूर पावडर सह तुमच्या आवडीचे इतर मसाले टाका.मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर हे स्टफींग गॅसवरुन खाली उतरवून ठेवा.हे स्टफींग कारल्यामध्ये टाकून कारली डीप फ्राय करा.कारली ब्राऊन रंगाची झाल्यावर ती एका प्लेटमध्ये टीश्यूपेपर काढून ठेेवा ज्यामुळे त्यामधील जास्तीचे तेल निघून जाईल.दुस-या एका कढईमध्ये तेल गरम करुन त्यात उरलेला अर्धा कांदा टाका.कांदा लाइट ब्राऊन रंगाचा झाल्यावर त्यात सुके मसाले व उरलेले स्टफींग टाका.कांदा चांगला शिजल्यावर त्यात डीप फ्राय केलेली भरलेली कारली टाका व दोन ते तीन मिनीटे झाकण ठेऊन शिजू द्या.मिश्रण खाली उतरवा व गरमगरमच वाढा.तसेच आमचूर पावडरचे ’6′ आरोग्यदायी फायदे ! जरुर वाचा.
५.कारल्याची डाळ- या सोप्या पद्धतीने केलेले कारले देखील स्वादिष्ट लागते.
कृती- एका भांड्यामध्ये ५०० ग्रॅम मुगडाळ स्वच्छ धुऊन भिजत ठेवा.अर्धा दुधीभोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी चिरुन त्या स्वच्छ धुऊन घ्या.प्रेशर कुकरमध्ये डाळ,दुधी भोपळा,पाणी,मीठ व हळद घेऊन मिश्रणाला दोन शिट्या होईपर्यंत शिजवा.त्या दरम्यान चार ते पाच मध्यम आकाराची कारली धुऊन चिरुन घ्या व त्यामध्ये चिमूटभर मीठ व हळद टाका.कढईत तेल घ्या व कारली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.कढईतून परतलेली कारली काढून बाजूला ठेऊन द्या.कढईमध्ये पुन्हा थोडे तेल घ्या व त्यात कलौजी अथवा काळे तिळ टाका.ते तडतडू लागल्यावर त्यामध्ये आल्याची पेस्ट,गरम मसाला,धणे पावडर,लाल तिखट,मीठ टाका व काहीवेळ हे मिश्रण चांगले परतून घ्या.या मिश्रणामध्ये फ्राय केलेली कारली टाका व पुन्हा परतून घ्या.शिजवलेल्या डाळीमध्ये हे मिश्रण टाकून डाळ चांगली मिक्स करा.डाळ पाच मिनीटे शिजू द्या व त्यानंतर गॅस बंद करा.तुम्हाला आवडत असेल तर या मिश्रणामध्ये एक चमचा बदामाची पावडर देखील तुम्ही टाकू शकता.
६.मस्टर्ड सॉसमधील कारली- काही मिनीटांमध्ये अगदी सहज होणारी ही झटपट स्वादिष्ट डीश तुमच्या जीभेवर बराच काळ रेंगाळत राहील.
कृती- २५० ग्रॅम कारली धुऊन स्वच्छ पुसून घ्या व त्याच्या लहान फोडी करुन त्यांना मीठ व हळद लावून ठेवा.कढईत तेल गरम करा व त्यामध्ये कारली डीप ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा.अर्धा कप मोहरी,चिमूटभर खसखस,एक हिरवी मिरची आणि पाणी टाकून मोहरीची पेस्ट तयार करा.कढईमध्ये तेल गरम करा व त्यात कलौंजी अथवा काळे तीळ टाका.त्यामध्ये मोहरीची पेस्ट टाकून चांगले परतून घ्या.धणेपूड,जिरापूड,लाल तिखट,मीठ टाकून चांगले परता.या मिश्रणामध्ये तळलेली कारली टाका व मिश्रण चांगले परतून घ्या.काही मिनीटांमध्ये भाजी शिजल्यावर गॅस बंद करा.लक्षात ठेवा या भाजीमध्ये गरम मसाले व आमचूर पावडर मिसळू नका.
७.कारल्याची मिक्स भाजी-जर तुम्हाला कारले आवडत नसेल तर ही कारल्याची मिक्स भाजी अवश्य करुन बघा.फक्त सर्वच भाज्यांमध्ये कारले टाकता येत नसल्यामुळे यासाठी काहीच ठराविक भाज्याच तुम्ही वापरु शकता.
कृती- तीन ते चार मध्यम आकाराची कारली घ्या व त्यामधील बिया काढून टाका.टोमॅटो,भोपळी मिरची,वांगी,लाल भोपळा समान प्रमाणात घ्या व धुऊन बाजूला ठेऊन द्या.पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात कलौंजी अथवा काळे तिळ,जिरे,मोहरीची फोडणी द्या.मोहरी तडूतडू लागल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो टाका व तो शिजेपर्यत परतून घ्या.त्यामध्ये गरम मसाला,धणे-जिरे पावडर,हळद,लाल तिखट,मीठ व आमचूर पावडरे हे मसाले मिसळून चांगले परतून घ्या.सर्व चिरलेल्या भाज्या टाका व त्यांना मसाले व्यवस्थित लागे पर्यंत परतून घ्या.पाणी टाका व कढईवर झाकण ठेवा.हे मिश्रण १५ मिनीटे शिजू द्या.तळाला लागू नये यासाठी मिश्रण अधूनमधून परतत रहा.पाणी सुकल्यावर गॅस बंद करा.तसेच ही हेल्दी टेस्टी रेसिपी – दूधी भोपळा मुठीया देखील जरुर करुन बघा.
८.कारल्याची आंबटगोड भाजी-या भाजीला असलेली आंबटगोड चव कारल्याचा कडूपणा नक्कीच कमी करते.
कृती- यासाठी मध्यम अथवा लहान आकाराची कारली घ्या व त्यांची दोन्ही टोके कापून टाका.कारली स्वच्छ धुऊन उभ्या आकारामध्ये चिरून घ्या.कारल्यामधील बिया काढून टाका व कारली बाजूला ठेऊन द्या.तुम्ही तुमच्या आवडीप्रणाणे त्याच्या फोडी करु शकता.कढईमध्ये तेल गरम करा व त्यामध्ये जिरा-मोहरीची फोडणी द्या.मोहरी तडतडू लागल्यावर त्यात कडीपत्ता,हिरवी मिरची व एक कांदा चिरुन टाका.दोन मिनीटे परता व त्यात आले-लसुणाची पेस्ट टाका.मीठ,हळद,आमचूर पावडर,गरम मसाला,लाल तिखट टाकून मिश्रण चांगले परतून घ्या.तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता.थोडे पाणी टाकून मिश्रण शिजू द्या.या मिश्रणामध्ये कारली टाका व चांगली परतून घ्या.या मिश्रणामध्ये एक चमचा चिंचेची पेस्ट किंवा पाव कप चिंचेचा कोळ घाला.कारली चांगली मऊ होईपर्यंत शिजू द्या.सर्वात शेवटी थोडासा गुळ घाला व ते विरघळू द्या.गॅस बंद करुन ताज्या कोथिंबीरींने ही भाजी गार्निश करा.
९.कारल्याचे लोणचे-कारल्याचे लोणचे स्वादिष्ट तर असतेच पण ते आरोग्यसाठी हितकारक देखील असते.
कृती-पाच मध्यम आकाराची कारली स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून त्याच्या लहान लहान फोडी करा.थोडेसे मीठ टाकून मिश्रण चांगले मिसळून तीस मिनीटे बाजूला ठेवा.मिश्रणामधील मीठाचे पाणी काढून टाकून कारली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या ज्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.कढईत तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मेथी व मोहरी टाका.ती तडतडू लागल्यावर त्यात बारीक चिरलेले आले व सहा-सात लवंगा टाका व त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून पाच मिनीटे परतून घ्या.मिश्रणामध्ये कारल्याच्या फोडी टाका.काही वेळ मिश्रण मध्यम आचेवर शिजू द्या.त्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर व मीठ मिसळा.गॅस मंद करा व त्यात तिखट टाका.कारली मऊ होईपर्यंत लोणचे शिजू द्या.मिश्रण ठंड झाल्यावर चांगल्या काचेच्या भरणीत भरुन ठेवा.तुम्ही हे लोणचे फ्रीजमध्ये ठेऊन दोन ते तीन दिवसानंतर देखील खाऊ शकता.फ्रीजमध्ये ठेवलेले कारल्याचे लोणचे सहा महिने टिकू शकते.
१०.कारल्याचा रस-जर तुम्हाला कारले आवडत असेल तर कारल्याच्या रसाचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
कृती- कमीतकमी दोन कारली स्वच्छ धुऊन चिरुन घ्या.त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून चांगले वाटून घ्या.मिश्रण गाळून त्याचा रस काढा.हा रस घेण्यापूर्वी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळा व चिमूटभर मीठ टाका ज्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock