दूधी ही फळभाजी युरीन इंफेक्शन कमी करण्यासोबतच मधूमेहींच्या आहारात अधिक फायदेशीर समजली जाते. पण त्याला खास चव नसल्याने लहान मुलांपासून मोठ्यांना दूधीचा भाजीत समावेश करून खाणं फारसे पसंत नसते. अनेकदा दूधी हलवा करूनच तो फस्त करतात. पण वेट लॉसच्या मिशनवर असणारे किंवा मधूमेहाचे रुग्ण दूधी हलवा खाऊ शकत नाही. अशावेळेस त्यांच्या आहारात दूधी भोपळ्याचा समावेश करण्यासाठी काही खास आणि टेस्टी रेसिपीमधून समावेश करणे आवश्यक असते. म्हणूनच कमीत कमी तेलात बनणारे दूधी भोपळ्याच्या मुठीया नक्की करून बघा.
दूधी भोपळ्याच्या मुठीसाठी लागणारे साहित्य -
- 1 वाटी किसलेला दूधी भोपळा
- 2 चमचे बेसन
- 2 चमचे तांदळाचे पीठ
- दीड चमचा गव्हाचं पीठ
- चमचाभर मसाला
- चिमुटभर हळद
- ओवा
- आलं-लसूण पेस्ट
- चवीपुरता मीठ
- धणा-जिर्याची पूड
कसे बनवाल दूधी भोपळ्याचे मुठीया
- स्वच्छ धुतलेला दूधी भोपळा सोलून त्याला किसा. किसलेल्या दूधी भोपळ्यामध्ये तांदूळ, बेसन आणि गव्हाचं पीठ मिसळा. त्यामध्येच मसाला ( किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या), ओवा, आलं-लसूण पेस्ट,हळद, धणा-जिर्याची पूड व मीठ मिसळा. या मिश्रणाचा घट्ट गोळा मळा. दूधीला पाणी सुटत असल्याने अधिक पाणी किंवा दही मिसळू नका.
- तयार पीठाच्या गोळ्याचे मुठी इतक्या लहान आकाराचे 3-4 उंडे बनवा. मोदकपात्रात किंवा कुकरमध्ये हे उंडे 7-10 मिनिटे वाफवा.
- वाफकलेले उंडे थंड झाल्यानंतर त्याचे लहान वडीसारखे काप करा.
- पसरट भांड्यात काप ठेवून बाजूला ठेवा.
- त्यानंतर फोडणीसाठी लहान भांडं गरम करून त्यात तेल घाला. गरम तेलात थोडी मोहरी टाका. मोहरी तडतडल्यानंतर गरम फोडणी ताटात पसरलेल्या कापांवर घाला. त्यावर थोडं ओलं खोबरं पसरा. आणि सारे मिश्रण नीट एकत्र करा मग या मुठीयांचा आस्वाद घ्या.
- तुम्हांला नुसत्या मुठीया खाणं कंटाळवाणं वाटत असेल तर दह्याची कढी करून त्यामध्ये डीप फ्राय केलेले पकोडे घालण्याऐवजी या मुठीयांचा समावेश करता येतो.
- तसेच ऑफिसमध्ये जाणार्यांना किंवा वेळी अवेळी भूक लागणार्यांसाठी हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय नक्की आजमावून पहा आणि आम्हांला सांगा कशा झाल्या होतात दूधी भोपळ्याच्या मुठीया !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock