होळीचा सण म्हणजे नैवद्याला पुरणपोळ्या या असल्याच पाहिजेत. काहींना दूध -पोळी आवडते तर काहींच्या घरी या खास दिवशी कटाची आमटी आणि पुरण पोळ्यांचा बेत असतो. पुरणपोळीमधील प्रमुख घटक असतो तो म्हणजे चण्याची डाळ. चण्याच्या डाळीमध्ये झिंक, कॅल्शियम आणि प्रोटीनचा मुबलक साठा असतो. चण्यामध्ये फॅट कमी असतात तर फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचायला हलकी असते. तसेच आरोग्यदायीदेखील असते. (नक्की वाचा : दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !) पुरण जरी चण्याच्या डाळीचे आणि आरोग्यदायी असले तरीही अनेकजण त्याचे बाहेरील आवरण मैद्याचे करतात. मैदा पचायला जड असते तसेच हृद्यरोगींसाठी मैद्याचे पदार्थ खाणे त्रासदायक ठरू शकते. पण पुरणपोळीचे बाहेरील आवरण मैद्याऐवजी रव्याचे किंवा गव्हाचे बनवल्यास ते अधिक हेल्दी होते. पुरणपोळीप्रमाणेच चणा डाळीची खीर हा गोड प्रेमींसाठी हेल्दी पर्याय आहे.
पुरणपोळीसाठीचे साहित्य -:
- पाव किलो ‘झिरो’ नंबर/ साईझचा रवा
- पाव किलो चण्याची डाळ
- पाव किलो गूळ
- वेलची पूड
- जायफळ पूड
- सुंठेची पावडर
- साजूक तूप
पुरण कसे बनवाल ? चणा डाळ स्वच्छ धुऊन प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्या. त्यानंतर वाफवलेली डाळ गाळून त्याचे पाणी आणि डाळ वेगवेगळी करा. कढई गरम करून तूपात गुळ आणि डाळ एकत्र करून थोडी शिजवा. गॅस बंद करून त्यामध्ये चिमूटभर वेलची पूड, जायफळ पूड आणि सुंठेची पावडर मिसळा. तयार मिश्रण कोमट असतानाच पुरणपात्रात घालून त्याचे बारीक पुरण बनवा.
पोळीच्या आवरणासाठी -: पोळीचे आवरण रव्याचे बनवताना झिरो साईझचा रवा दुधाच्या हलक्या हाताने मळा. फुड प्रोसेसरमध्ये हा गोळा अधिक चांगला बनतो. रवा मळता -मळता त्याचा तयार झालेला गोळा काही वेळ झाकून ठेवा. काही वेळाने लहान लहान गोळे करून त्यात पुरण भरा आणि साजूक तुपाच्या सहाय्याने पोळ्या लाटा. तव्यावर मंद आचेवर या पोळ्या खरपूस भाजा. या पोळ्या आवडीनुसार दूध, चहा, तूप किंवा कटाच्या आमटीसोबत खाऊ शकता. घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी देखील जाणून घ्या .
छायाचित्र सौजन्य: Shutterstock