घरात लहान मुलांचा वावर म्हणजे उत्साह,आनंद, दंगामस्ती हे सारंच आपसुक येतं. पण एरव्ही आनंदाने घरभर उड्या मारणारं मूल सतत आजारी, झोपलेलं किंवा थकलेलं दिसायला लागलं की घरातल्या लोकांनाही काहीतरी चुकल्यासारख्या वाटतं. काही वर्षांपूर्वी गोरेगाव स्थित विश्वकर्मा यांच्या घरातील स्थिती देखील अशीच काहीशी होती. सप्टेंबर 2015 मध्ये विश्वकर्मा कुटूंबाची 7 वर्षांची बाहूली, माधवी अचानक शांत शांत रहायला लागली होती. माधवी नेहमीपेक्षा अधिक वेळ झोपतेय, सतत दमतेय, तिचं वजनही खालावतय अशी लक्षणं स्मिता विश्वकर्मा ( माधवीची आई) यांच्या लक्षात आली.
7 वर्षीय माधवी सर्दी- खोकल्यामुळे सतत आजारी राहतेय. त्यामुळे सुरवातीला तात्पुरती औषधं दिली जात असे. मात्र त्यानंतर हा त्रास अधिकच वाढत असल्याने पालकांसोबत डॉक्टरांचीदेखील काळजी वाढली. मुंबईतील काही नामांकीत हॉस्पिटल्समध्ये माधवीवर उपचार होत होते. मात्र अनेक चाचण्यांनंतर आलेले रिपोर्ट पाहून विश्वकर्मा कुटूंबीयांच्या पायाखालील जमीनच हादरली. माधवीचे हृद्य केवळ १०-२० % म्हणजे अगदी काही दिवस काम करू शकेल अशा स्थितीत होते. माधवीला वाचवण्यासाठी केवळ हार्ट ट्रान्सप्लॅन्ट हाच उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार हृद्य प्रत्यारोपणासाठी नोंदणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
- ध्यान उदानी – विश्वकर्मा कुटूंबियांसाठी देवदूत !!
माधवीच्या हृद्याला एका विशिष्टप्रकारे इंफेक्शन झाले होते. dilated cardiomyopathy यामध्ये हृद्याचा आकार वाढतो परिणामी हृद्याची कार्यक्षमता मंदावते. अवघे आठ्वडाभर माधवीचे हृद्य सुरळीत काम करू शकेल असा स्थितीत असताना, हृद्य प्रत्यारोपणासाठी नोंदणी केल्यानंतर काही दिवसातच माधवीला दाता मिळाल्याचा फोन विश्वकर्मा कुटुंबीयांकडे खणाणला. ‘ध्यान उदानी या मुलाच्या स्वरूपात देवदूतच आला’. असे स्मिता विश्वकर्मा सांगतात. रक्तगट, वजन,आकार यासारख्या सार्याच आवश्यक गोष्टी जूळून आल्यानंतर 31 जानेवारी 2016 रोजी मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये माधवीवर यशस्वी हृद्य प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. महाराष्ट्रात 7 वर्षीय माधवी ही यशस्वी हार्ट ट्रान्सप्लॅन्ट झालेली सगळ्यात लहान रुग्ण होती.
‘ध्यान हा आजही आपल्यातच आहे. त्याच्या हृद्याच्या स्वरूपात माझ्या मुलीच्या शरीरात आणि आपल्यातच आहे. ‘असे विश्वकर्मा कुटूंबीय सांगतात. नक्की वाचा – वडीलांना यकृतदान करून , त्यांना जीवनदान देणार्या जुही पवारची प्रेरणादायी कहानी
- माधवीचा दिनक्रम सामान्य मुलांप्रमाणेच !
हृद्य प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 22 -23 दिवसांच्या आरामानंतर माधवी पुन्हा हळूहळू सामान्य मुलांप्रमाणे सारी मज्जा करते. लक्षधाम स्कूल येथे शिकणार्या माधवीने 2016 च्या दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेत जायला सुरवात केली आहे. खाण्या- पिण्याची सामान्य पथ्य सांभांळत माधवी इतर मुलांप्रमाणेच सारी मज्जामस्ती करते. दंगा करते,खेळते.
अगदीच कोवळ्या वयात माधवीने ‘हृद्य प्रत्यारोपणा’सारख्या कठीण शस्त्रक्रियेवर मात केली. जिद्दीने पुन्हा उभ्या राहिलेल्या माधवीला भविष्यात हृद्यरोग तज्ञ व्हायचे आहे. जशी ‘ध्यान’च्या रूपात तिला मदत झाली तशीच तिला भविष्यात लोकांना मदत करायची आहे. नक्की वाचा :अवयवदानाबाबत हे ’23′ प्रश्न आजच तुमच्या मनातून दूर करा !
अवयव दानाबाबत समाजात आजही पुरेशी जागृती नाही. त्यातही लहान मुलांच्या अवयवदानाबाबत फारसे सकारात्मक चित्र नाही. म्हणूनच विश्वकर्मा कुटूंबियातील सार्यांनीच अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. माधवीला वाचवण्यासाठी जसा ध्यान उदानी आणि त्याचे कुटूंबीय पुढे आले तसेच आपल्या प्रत्येकाच्या अवयवदानाच्या एका निर्णयामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाचा सार्यांनीच गांभीर्याने विचार करावा असे आवाहन विश्वकर्मा कुटूंबीयाने केले आहे. नक्की वाचा दूर करा ‘अवयवदाना‘ संबंधीचे हे ५ गैरसमज
- माधवीने ‘लिटील हार्ट मँरेथाँन’ पूर्ण करणं अभिमानास्पद क्षण – स्मिता विश्वकर्मा
धावणं हा केवळ वजन घटवण्याचा किंवा वजन वाढवण्याचा हेल्दी फंडा नव्हे तर यामुळे शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. बदलती आणि तणावग्रस्त जीवनशैली अनेक आजारांसाठी आमंत्रण ठरत आहे. त्याचा थेट परिणाम हृद्यावरही होतो. याच पार्श्वभूमीवर मुलांमध्ये, पालकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने सजगता वाढवण्यासाठी ‘लिटील हार्ट मँरेथाँन’ चे आयोजन करण्यात आले होते. बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयातर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित यंदाच्या मॅरोथॉनमध्ये सुमारे १२०००हून अधिक विद्यार्थी धावले. मात्र माधवी विश्वकर्मा या 8 वर्षीय चिरमुडीसाठी आणि तिच्या कुटूंबीयासाठी ही मॅरोथॉन खास होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी माधवी विश्वकर्मावर ह्रद्यरोग प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर माधवीने मॅरॅथॉन पूर्ण करणं आमच्यासाठी अभिमानची आणि आनंदाची गोष्ट असल्याचे स्मिता विश्वकर्मा सांगतात.
छायाचित्र सौजन्य – Gloocal PR