Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
अर्थ्राईटीसच्या रुग्णांमध्ये सांध्याचे दुखणे पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. तीव्र वेदनांसोबत हालचाल करताना होणारा त्रास, चढ -उतार करताना घ्यावी लागणारी मदत यामुळे अनेकदा हतबलता वाढते.
अर्थ्राईटीसच्या रुग्णांमध्ये जीवनशैलीत आणि आहारात काही बदल केल्यास त्रास थोडा सुसह्य करण्यास मदत होते. म्हणूनच अर्थ्राईटीसच्या रुग्णांनी आहारात कोणते बदल करावेत याबाबत प्रसिद्ध आहारतज्ञ नयनी सेतलवड यांनी दिलेला हा सल्ला नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरेल.
काय खाल ?
- मसाल्याचे पदार्थ -:
कांदा,लसुण यांचा आहारात समावेश करावा. मात्र वात वाढू नये म्हणून त्यासोबत आल्याचादेखील वापर करा. दिवसभर थोडा आल्याचा तुकडा चघळत राहणेदेखील अर्थ्राईटीसच्या रुग्णांना फायदेशीर ठरतो. तुमच्या आहारात विविध प्रकारच्या मिरच्यादेखील फायदेशीर ठरतील. हिरवी मिरची, सिमला मिरची यांचा आहारात समावेश करा. यासोबतच लवंग आणि दालचिनीचा वापरदेखील फायदेशीर ठरतो.
- भाकर्यांचा आस्वाद घ्या -:
केवळ चपातीवर अवलंबून न राहता ज्वारी, नाचणी,बाजरीच्या भाकर्यादेखील अवश्य बनवा. ऋतूमानानुसार बाजरी आणि नाचणीची निवड करा. त्यामधील पोषणद्रव्य अर्थ्राईटीसचा त्रास कमी करतात.
- फॅट्स पूर्णपणे टाळू नका -:
सांध्याची हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी काही आरोग्यदायी फॅट्स फायदेशीर ठरतात. अक्रोड, काजू, पिस्ता यांमधील फॅट्ससोबत पोषणद्रव्यदेखील मिळतात. सूर्यफुलाच्या बीया, तीळ,अळशी यांचा आहारातील समावेश वाढवा. चपात्यांवर थोडे साजूक तूप लावा. या फॅट्समुळे सांध्यांना वंगण मिळणे. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते.
हे पदार्थ खाणे टाळा -
- आंबट पदार्थ टाळा
टोमॅटो,लिंबू, आवळा, चिंच, दूधाचे पदार्थ आणि गव्हामुळे सांध्याचे दुखणे वाढू शकते. मात्र असे पदार्थ टाळल्यास शरीराला होणारा व्हिटॅमिन सीचा पुरवठा कमी होतो. व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी पेरू किंवा कोकमाचा आहारात समावेश करा. यामुळे व्हिटॅमिन सीची कमरता आणि सांध्यांच्या दुखण्यासोबत वाढणारा दाह कमी होण्यास मदत होते.
- पांढरे पदार्थ टाळा -
मैदा, साखर, मीठ अतिप्रमाणात खाणे टाळा. साखरेऐवजी गूळ किंवा खजूराचा वापर करा. पांढर्या मीठाऐवजी रॉक सॉल्ट वापरा. त्यामध्ये मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतील.
- व्हिटॅमिनच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा
तुमच्या आहारातील व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी 3च्या पातळीवर नियंत्रण ठेवा. त्याचे प्रमाण आवशयकतेपेक्षा कमी असल्यास डॉक्टरांच्या मदतीने ते वाढण्यासाठी औषधोपचारांची मदत घ्या.व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी 3 ची कमतरता हे सांध्याच्या दुखण्याचे लक्षण आहे.
आहारातील या बदलांसोबत नियमित औषध गोळ्या घ्याव्यात.