Read This in English
पावसाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकल्यासोबत तापामुळे अनेकांची तब्येत खालावते. पण ताप नेमका व्हायरल, सिझनल फ्लू की इतर काही आजारांचा आहे हे जाणून घेण्यासाठी नेमके कधी डॉक्टरकडे जावे हे माहिती असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे किती दिवसांचा ताप चिंतेचा विषय ठरू शकते हे जाणून घेण्यासाठी अपोलो हॉस्पिटल, बेंगलोरचे निओनॅटोलॉजिस्ट आणि पेडीअॅट्रीशिअन डॉ. प्रशांत यांनी खास सल्ला दिला आहे.
डॉ. प्रशांत यांच्यामते, वयोमानानुसार तापाचे स्वरूप विविध असते. फ्लू व्हायरसमुळे ताप येत असल्यास व्हायरल फिव्हर 5 दिवसात ठीक होतो. तीन दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तापाचे नेमके कारण जाणून घ्या. बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे ताप येत असल्यास हा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. हा ताप कमी होण्यासाठी किमान आठवडाभराचा काळ लागू शकतो.
पहिल्याच निदान चाचणीमध्ये व्हायरल किंवा बॅक्टेरियल इंफेक्शनचे नेमके कारण समजू शकत नाही. तापाचे स्वरूप अधिक असल्यास डॉक्टर रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देतात. तापासोबत डोकेदुखी, कफ, सर्दी आणि थ्रोट इंफेक्शन असल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
लहान मुलांमध्ये ताप 48 तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास हा चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता ताप उतरण्याची वाट पाहत राहू नका. लहान मुलांची रोगप्रकारशक्ती कमकुवत असते. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा ताप दुर्लक्षित करू नका. तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करा. नवजात बालकं किंवा लहान मुलांवर तापासाठी घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका.