छायाचित्र सौजन्य – IANS Photos
मेक इन इंडीया सप्ताहादरम्यान मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान भीषण आग लागल्याने या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. छोट्या स्वरूपात लागलेली आग वार्याच्या झोकामुळे पसरली आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीच्या लपेट्यात स्टेज जळून खाक झाला असला तरीही कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांच्यापाठोपाठ अभिनेत्री पूजा सावंत हीचा लावणीचा नृत्यप्रकार सुरू असताना आगीचा भडका उडाला आणि कार्यक्रम ताबडतोब थांबवण्यात आला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डिझास्टर मॅनेजमेंट आणि मुंबई पोलिसांनी सावधानता राखत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवल्याने कलाकारांसह नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आला आहे.
कधी मानवी चूकीमुळे तर कधी नैसर्गिक / आपत्कालीन समस्येमुळे अचानक आग लागण्याच्या दुर्देवी घटना घडू शकतात. म्हणूनच प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे.
आग लागल्यास कोणती काळजी घ्याल ?
- आग लागलेल्या ठिकाणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा आणि आत अडकलेल्यांसाठी मदत मागा.
- जवळच्या अग्नीशामक दलाशी संपर्क साधून तात्काळ मदत घ्या.
- आगीच्या दुर्घटनेत लोकं घाबरल्याने किंवा गुदमरल्याने बळी जाण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे अधिकाधिक जागा मोकळी करण्याचा प्रयत्न करा.
- इलेक्ट्रिक स्विचेस / उत्पादन बंद,चालू करू नका. प्रज्वलनशील पदार्थांना थेट हात लावू नका.
- लहान मुलांना गॅस,गरम वस्तू अशा इजा पोहचवणार्या वस्तूंपासून किमान 3 फूट लांब ठेवा.
- गॅस सिलेंडर लीक होणे हेदेखील आगीचा भडका उडण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तसे होत असल्याचे आढळल्यास पाळा हे ‘सुरक्षेचे उपाय’
आगीत भाजल्यास कशी मदत कराल ?
- आगीची झळ लागल्याने जखम झाल्यास थंड वाहत्या पाण्याखाली जखम धरा. मात्र त्यावर बर्फ चोळू नका. भाजल्यानंतर या ’5′ गोष्टी मूळीच लावू नका
- त्वचा भाजली असल्यास त्यावर थंड पाण्याचा हबका मारा मात्र चोळू किंवा बांधू नका. अन्यथा संसर्ग होण्याची शक्यता असते.
- गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. संबंधित व्यक्तीला मऊ, सुती कपाड्यात लपेटा.
आगीपासून घराला सुरक्षित ठेवण्यासाठी ‘नॅशनल सेफ्टी काऊंसिल‘ने दिलेल्या खास टीप्स
- घरात स्मोक अलार्म आणि कार्बन मोनोक्साईड अलार्म लावून घ्या. तसेच त्याची बॅटरी नियमित वर्षातून एकदा बदला.
- आपत्कालीन परिस्थितीत गोंधळून जाऊ नका. आसपासच्या लोकांना, कुटुंबियांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा.
- फायर एक्सटिंग्विशर कसे वापरावे त्याची माहिती करून घ्या.
- वर्षातून एकदा ‘मॉक ड्रिल’ करा म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये गोंधळ होणार नाही.