Read this in English
Translated by – Dipali Nevarekar
येत्या नव्या वर्षात हेल्दी राहण्याचा आणि वजन आटोक्यात ठेवण्याचा मानस तुम्ही केलाय ? मग या नववर्षाच्या संकल्पाची सुरवात गोड झालीच पाहीजे. यंदा अशा सेलिब्रेशनसाठी विकतची मिठाई, चॉकलेट खाण्यापेक्षा ‘खजूर रोल्स’ हा हेल्दी डेझर्टचा प्रकार नक्की करून पहा. नैसर्गिकरित्या गोड आणि उष्ण प्रवृत्तीचा खजूर हिवाळ्याच्या दिवसात खाणे फायदेशीर आहे. खजुरातून शरीराला आयर्नचा पुरवठा होतो. झटपट होणारा आणि आबालवृद्धांना आवडणारे ‘खजूर रोल्स’ मधल्या वेळेत लागणारी भूक शमवण्यास मदत करतो. रोल्स प्रमाणेच नाश्त्याला केळं-खजूराचा मिल्कशेकदेखील उत्तम पर्याय आहे.
- खजूर रोल्स बनवायला लागणारा वेळ -
5 मिनिटे
- साहित्य -:
काळा मस्कदी खजूर - 3 ते 4 कप
साजूक तूप – अर्धा टीस्पून
चिरलेले बदाम – 1 टीस्पून
चिरलेले अक्रोड- 1 टीस्पून
चिरलेले पिस्ता – 1 टीस्पून
खसखस – 2 टीस्पून
यापासून किमान 6-8 खजूर रोल्स बनू शकतात.
- कृती – :
गॅसवर कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यानंतर बीया काढलेले खजूर परतून घ्यावेत. काळा खजूर नरम असल्याने तो हाताने कुस्करणे सहज शक्य असते. मात्र खजूर कडक किंवा लाल असल्यास तो एकदा मिक्सरमधून काढून घ्यावा.
यामध्ये बदाम, अक्रोड आणि पिस्ता मिसळून छोटे छोटे गोळे करावेत.
त्यांना चपट बनवून खसखसमध्ये घोळवावे.
त्यानंतर काही वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावे.
- खजूर रोल्समधून मिळणारी पोषणद्रव्य -:
Energy | Protein | Carbohydrates | Fat | Calcium | Fibre | Iron |
81 calories | 1.9 gm | 9.6 gm | 3.8 gm | 75.2 mg | 0.9 gm | 1.1 mg |
खजूर, सुकामेवा आणि खसखस यापासून तयार होणारे खजूर रोल्स अतिरिक्त साखरेव्यतिरिक्त बनवलेले असल्याने चवीष्ट आणि शरीराला पोषक ठरतात. खजूर हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. तर सुकामेव्यामुळे शरीराला उर्जा मिळते. खसखसमधून शरीराला प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा पुरवठा होतो. तसेच प्रेझरव्हिटीव्हशिवाय बनवलेले हे खजूर रोल्स तुम्ही फ्रिजमध्ये काही दिवस बनवून ठेवल्यास टिकतात. लहान मुलांसाठी हे ‘खजूर रोल्स’ चॉकलेट्ससाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
छायाचित्र सौजन्य -: Shutterstock