माफी मागणाऱ्याचं मन खूप मोठं असतं आणि माफ करणाऱ्याचं मन त्याहून मोठं असतं. असं सामान्यपणे बोलले जाते. परंतु, हे अगदी खरे आहे. आजकाल आपण बघतो की नात्यातील विसंवाद, गैरसमज यामुळे अनेक नाती दुरावली जातात. भावनांचा गुंता होतो आणि त्या गुंत्याची एक गाठ बनते अगदी आपल्या नकळत. अशा प्रत्येक गाठीचं एक ओझं मनावर येतं. स्वाभाविकच ताण वाढत जातो. ताण वाढायला लागला की मनात अस्थिरता निर्माण होते आणि मानसिक शांतता भंग पावते.
असा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. मग हा भावनिक गुंता कसा सोडवायचा, हा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठी आम्ही ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या आणि गेली १५ वर्ष कॉउंसलिंगचा अनुभव असणाऱ्या कॉऊन्सिलर डॉ. सुचित्रा नाईक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी यावर योग्य मार्गदर्शन केले.
समजा तुमच्या हातात पाण्याचा एक ग्लास आहे. आणि तुम्हाला कोणी विचारलं की याचा तुम्हाला त्रास होतोय का ? तर तुम्ही नाही म्हणाल. कारण एका ग्लासाचं काय वजन होणार ? परंतु, तुम्हाला कोणी सांगितलं की ग्लास धरून दोन दिवस रहा. तर हात दुखेल ना ? नक्कीच. तसंच एखादी भावना मुख्यतः राग मनात सतत धरून ठेवल्याने मनावरील ओझं वाढतं. जे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असते.
षडरिपू म्हणजे आपले सहा शत्रू. आपल्या ज्या सहा भावना आहेत म्हणजेच मत्सर, काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहं. खरंतर हेच आपले सहा शत्रू आहेत. यावर जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला दुसऱ्याला माफ करता यायला हवं. जसं आपण दुसऱ्याला उदार मनाने माफ करतो तसंच आपल्याला स्वतःला देखील माफ करता यायला हवं. कारण अपराधीपणाची भावना अत्यंत त्रासदायक असते. या दडपणामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर-मनावर ताण येतो. म्हणून रोजच्या रोज आपलं मन साफ असणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते माफ कारण्यातूनच साध्य करता येईल. या ‘८’ संकेतांवरून ओळखा तुम्ही भावनिकरीत्या कमकूवत आहात !
माफ करण्याचे फायदे:
- माफ केल्याने मनावरील ताण हलका होतो.
- भावनिक गुंता दूर होतो.
- आपला इगो कमी होतो.
- मानसिक शांतता प्राप्त होते.
- भावनिक स्थिरता निर्माण होते.
- मन शांत, रिलॅक्स, आनंदी असेल तर शरीर देखील निरोगी राहतं.
शारीरिक व्यायामाचे महत्त्व, फायदे आपण जाणतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते. त्याचप्रमाणे मनाला देखील व्यायाम मिळाला तर मनाचे आरोग्य उत्तम राहील. त्यासाठी भारतीय संस्कृतीत मनाच्या श्लोकांचा पाठ सांगितला आहे. राग मनात धरून ठेवल्याने मानसिक आरोग्य बिघडते परिणामी शारीरिक आरोग्याची नासाडी होते. त्यामुळे भावनांचा वेळीच निचरा होणे गरजेचे आहे. अन्यथा मानसिक अस्थिरता निर्माण होऊन मनाचं आरोग्य बिघडतं.
एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीचं, वाईट वागली की आपल्याला राग येतो. परंतु, या रागामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. समोरच्याच्या नाही. त्यामुळे जी लोक तुमच्याशी वाईट वागली आहेत किंवा वागत आहेत, त्यांना जरी त्यांच्या चुकीची जाणीव नसेल तरी त्यांना वेळीच माफ करा. कारण धरून ठेवलेला राग शरीराद्व्यारे प्रकट होऊ लागतो आणि शारीरिक व्याधी, विकार जडतात. आता असे सिद्ध झाले आहे की, ९९% आजारांचे मूळ हे आपल्या मनातच असतं. याचाच अर्थ तुम्हाला निरोगी आयुष्य हवं असल्यास मन शुद्ध, स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जितके रागापासून मोकळे होऊ तितके मुक्त होऊ. या ‘१०’ लक्षणांवरून ओळखा तुम्ही भावनिकरीत्या सक्षम आहात !
तुम्ही कधी भावनांचा, नात्यांचा, गैरसमजाचा हा गुंता थोडा सोडवण्याचा प्रयत्न केला की असेल तर तुम्हाला जाणवेल की ‘अहं’ आड येतो. ‘अहं’ म्हणजेच इगो. हा इगो कितीही प्रयत्न केला तरी जागचा हालत नाही. अगदी ठाण मांडून बसतो. म्हणून रोजच्या रोज भावनांचा निचरा होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा गुंता होणार नाही. आणि जरी काही गैरसमजाच्या गाठी बसल्या तरी त्या हळुवार सोडवायच्या. शक्य तितकं मन स्वच्छ ठेवायचं. मन साफ तर सार काही माफ. केवळ शारिरीक नाही तर मानसिक समस्यांचाही वेळीच निचरा करा : अमृता सुभाष
छायाचित्र सौजन्य – Shutterstock