ब-याचदा पुरुषांसमोर मासिकपाळी विषयी बोलले जात नाही.मात्र काही पुरुष मासिकपाळी व त्यामुळे स्त्रीला होणा-या वेदना समजून घेतात पण सर्वच पुरुषांना हे जमत नाही.महिला देखील पुरुषांना तिच्या शरीरात होणा-या या मासिक बदलाबद्दल मोकळेपणाने सांगत नाहीत.काही स्त्रीया तर त्यांच्या पतीला देखील मासिक पाळी बाबत सांगण्यास संकोच करतात.खरंतर हे मुळीच योग्य नाही.पुरुषांनी देखील मासिक पाळीबाबत जाणून घेणे गरजेचे आहे जेणे करुन हा विषय समाजात निषिद्ध समजला जाणार नाही.अनेक जणींना या समस्येमधून जावे लागत असल्यामुळे या विषयावर चर्चा करणे हाच एक उत्तम मार्ग आहे.जर तुम्हाला देखील हे योग्य वाटत असेल तर तुमच्या आयुष्यातील पुरुषांसोबत मासिक पाळी विषयी चर्चा करण्यासाठी ही माहिती जरुर वाचा.
वडील-वडीलांसोबत मासिक पाळी विषयी बोलण्याचा तुम्हाला संकोच वाटू शकतो पण तुम्ही त्यांच्याशी या विषयी बोलणे गरजेचे आहे.तुमच्या वडीलांचे वय व अनुभव पहाता त्यांना याबाबत पुरेशी माहिती असण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.काही जणी तर त्यांच्या वडीलांना सॅनिटरी पॅट खरेदी करुन आणण्यास सांगतात व त्यांना मासिकपाळी विषयी वडीलांना सांगण्यास मुळीच संकोच देखील वाटत नाही.तुम्हाला अगदी तसे करायचे नसेल तरी कमीतकमी तुम्ही ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवता कामा नये.त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मासिक पाळीच्या वेदना सहन न झाल्यामुळे तुम्ही लवकर घरी जाल तेव्हा तुमच्या वडीलांना याबाबत खरे कारण जरुर सांगा.तसेच मासिकपाळी दरम्यानच्या वेदना घालवण्यासाठी हा नैसर्गिक उपाय देखील जरुर करा.
भाऊ-तुमच्या भावाला देखील मासिक पाळीबाबत थोडेफार नक्की माहित असते त्यामुळे तुमचे सॅनिटरी पॅड त्याच्यापासून लपवून ठेवण्याची मुळीच गरज नाही.तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे त्याला देखील समजू दे.तुम्ही तुमच्या भावासोबत मासिक पाळीबाबत मोकळेपणाने बोलू शकता व तो जर याबाबत तुमची थट्टा करीत असेल तर त्याला रोखू देखील शकता.कदाचित त्याच्या आयुष्यात येणारी मुलगी तुम्हाला यासाठी थॅक्स म्हणू शकते.यासाठी वाचा मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!
बॉयफ्रेन्ड किंवा पती-तुमच्या जोडीदारासोबत मासिकपाळीबाबत बोलणे फार सोपे असू शकते.त्यांना तुमची मासिक पाळी,त्यामध्ये होणारा फ्लो,तुम्ही त्याकाळात करणा-या उपाययोजना याबाबत सर्व काही माहित असणे फार गरजेचे आहे.शारीरिक जवळीक करताना त्यांना तुमच्या मासिक पाळीची तारिख माहित असल्यास फायद्याचे ठरेल.
मुलगा- तुमच्या मुलांना अगदी लहानपणापासूनच स्त्री व पुरुषांच्या मानवी शरीर रचनेबाबत व त्यामध्ये असलेल्या फरकाबाबत समजावून सांगणे गरजेचे आहे.त्यांना मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाबाबत माहिती द्या.अगदी गर्भाशय व अंडाशयाचे कार्य देखील व्यवस्थित समजावून सांगा.तुमच्या लहान मुलांशी बोलताना त्यांना समजेल अशा भाषेत ही माहिती सांगा.
कलीग किंवा बॉस-पॅड चेंज करण्यासाठी वॉशरुममध्ये तुम्ही पॅड कसे घेऊन जाता? पिशवीमध्ये,जीन्सच्या पाकीटात,हातामध्ये फोल्ड करुन तुम्ही बॅगच वॉशरुममध्ये घेऊन जाता.आपण कितीतरी वेळा महिला केस विंचरण्यासाठी अथवा लिपस्टीक लावण्याच्या बहाण्याने वॉशरुममध्ये पॅड चेंज करण्यासाठी गेलेल्या पहातो.सॅनिटरी पॅड सारखी आवश्यक गोष्ट महिला का लपवितात? तुमची मासिक पाळी सुरु आहे व तुम्हाला वॉशरुममध्ये पॅड चेंज करण्यासाठी जाण्याची गरज आहे हे लोकांपासून लपवू नका.तसेच जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये येणा-या क्रॅम्पमुळे ऑफिसमध्ये बसणे शक्य नसेल तर तुम्ही ते तुमच्या पुरुष सहकारी अथवा बॉसला सांगणे आवश्यक आहे.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock