लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. बालपणी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवर त्यांचे भविष्य अवलंबून असते. मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आजकाल बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. मात्र प्राचीन काळापासून आयुर्वेदात लहान मुलांवर ‘ सुवर्णप्राशन संस्कार’ करण्याचा सल्ला दिला जातो. सोनं हे सौंदर्य तर वाढवतेच पण त्याचे औषधी गुणधर्मही आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
- सुवर्णप्राशन म्हणजे काय ?
सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते. नवजात बालकांपासून ते 12 वयोवर्षाच्या मुलांपर्यंत सार्यांना या औषधांचे काही थेंब दिले जातात. पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांवर ‘सुवर्णप्राशना’चे संस्कार करणे अधिक हितावह ठरते. यामुळे मुलांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.
- सुवर्णप्राशनाचे फायदे -
- मेंदूचा विकास -
लहान मुलांच्या मेंदूचा विकास हा सकस आहारावर अवलंबून असतो. त्यामुळे पोषक आहाराबरोबरीनेच ‘सुवर्णप्राशना’चे काही थेंब मुलांना दिल्यास त्यांचा मेंदूचा विकास होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
2. आकलन क्षमता सुधारते -
लहान मुलांमध्ये चंचलता अधिक असल्याने त्यांचे अभ्यासात लक्ष न लागण्याची समस्या अनेकांमध्ये आढळते. अशावेळी त्यांच्यामध्ये स्थिरता आणून ‘आकलन’ व एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी ‘सुवर्णप्राशन’ मदत करते.
3. रोगप्रतिकारशक्ती वाढते -
वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे किंवा संसर्ग जडण्याचे प्रमाण अधिक असते त्यामागील प्रमुख कारण म्हणजे कमकुवत ‘रोगप्रतिकार शक्ती’ ! वारंवार मुलं आजारी पडत असल्यास त्यांना ‘सुवर्णप्राशन’ देणे हितावह आहे. मॉन्सूनमध्ये ‘इम्युनिटी’ वाढवारे ’5′ नैसर्गिक पर्याय
4. पचन सुधारते -
चटकदार किंवा काही अरबट -चरबट खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असते. याचा दुष्परिणाम मुलांच्या पचनसंस्थेवर होऊन लहान वयात जडणारा ‘अतिलठ्ठपणा’ (Obesity) , मधूमेह याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा धोक्यांपासून बचावण्यासाठी सुवर्णप्राशनाचे थेंब गरजेचे आहे.
5. वातावरणातील बदलांपासून बचाव होतो -
ऋतूचक्रात बदल झाल्यास त्याचा तात्काळ परिणाम लहान मुलांवर होतो. अशावेळी त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवण्याचे काम ‘सुवर्णप्राशन’ करते. त्यामुळे मुले अधिक सुदृढ होतात.
6. दात येताना होणारा त्रास कमी होतो –
लहान मुलांसाठी ‘दात’ येण्याची प्रकिया ही फारच त्रासदायक असते. या काळात मुलं चिडचिडी होतात. मग त्यांचा हा त्रास थोडा सुककर करण्यासाठी ‘सुवर्णप्राशन’ फायद्याचे ठरते. बाळाला दात येताना होणारा त्रास सुसह्य करणार्या 5 टिप्स !
7. घातक घटकांपासून बचाव होतो -
आजकाल भाज्या, फळ झटपट उगवण्यासाठी काही रासायनिक खतांचा, औषधांचा पिकांवर फवारा केला जातो. अशा भाज्या नीट धुवून,शिजवून खाल्ल्या तरीही त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अशा घातक घटकांपासून बचावण्यासाठी मुलांना दिलेले ‘सुवर्णप्राशन’ अमृतच ठरते.
8. रंग सुधारतो -
लहान मुलांचा रंग सुधारण्यासाठीही ‘ सुवर्णप्राशन’ फायदेशीर ठरते. जरूर वाचा हे गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !
9. कार्यक्षमता सुधारते -
लहान मुलांमध्ये व्यायामाच्या , पोषक आहाराच्या अभावामुळे शरीरात फोपसेपणा वाढण्याची भीती असते. अशावेळी मुलांची शारिरीक, बौद्धिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन देणे गरजेचे आहे.
- कोठे दिले जाते ‘सुवर्णप्राशन’ ?
आयुर्वेदिक रुग्णालयांमध्ये तसेच काही नामांकित आयुर्वेदिक केंद्रांमध्ये मुलांना ‘सुवर्णप्राशना’चे संस्कार शिबीर आयोजित केले जाते.