Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
बारमाही उपलब्ध असणारे फळं म्हणजे केळं. शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासोबत त्वचेचे, केसांचे सौंदर्य सुधारण्यासाठी केळ फायदेशीर ठरते. मात्र केवळ केळ्याचे फळच नव्हे तर केळ्याच्या झाडाचे अन्य भागदेखील औषधी आहेत. केळफूल, केळ्याचे खोड वजन घटवण्यास फायदेशीर ठरते. तसेच केळ्याची साल देखील दातांना चमक येण्यास, डासांचा डंख कमी करण्यास फायदेशीर ठरते. मग नेमका केळ्याचा आहारात अधिकाधिक वापर कसा करावा या तुमच्या मनातील प्रश्नावर नयाती मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या डाएटीशन डॉ.आस्था शर्मा यांनी काही फायदे सांगितले आहे. मग नक्की पहा केळ्याचे खोड कोणकोणत्या आजारावर फायदेशीर ठरू शकते.
किडनी स्टोन : केळ्याच्या खोडामध्ये diuretic म्हणजेच मूत्र साफ करण्याची क्षमता असते. यामुळे शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास फायदेशीर ठरते. यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. vitro studies मध्ये सांगितल्यानुसार, केळ्याच्या खोडाचा रस किडनी स्टोन्सच्या त्रासामध्ये फायदेशीर ठरते. पित्ताशयाच्या खड्याच्या त्रासामध्येही केळ्याचे खोड फायदेशीर ठरते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा त्याचा आहारात समावेश करावा.
वजन घटवण्यासाठी : फायबरयुक्त केळ्याचे खोड आणि त्याचा रस अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणार्यांनी केळ्याच्या खोडाचा रस नियमित पिणे फायदेशीर ठरते.
पित्त – : रिकाम्या पोटी केळ्याच्या खोडाचा रस प्यायल्यास फायदेशीर ठरतो. यामुळे हायपरअॅसिडीटीचा त्रास कमी होतो.
बद्धकोष्ठता -: केळ्याच्या खोडामध्ये फायबर घटक मुबलक असतात.हे रेचक असल्याने पोट साफ होण्यास तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. मात्र हा रस गाळून पिणे टाळा. तसे केल्यास त्यामधील अनेक फायबर घटक दूर होतात.
मधूमेह - केळ्याच्या खोडामध्ये साखर नसल्याने रक्तातील शर्करेचे प्रमाण अचानक वाढत नाही. न गाळता थेट केळ्याच्या खोडाचा रस प्यायल्यास तो मधूमेहींसाठी फायदेशीर आहे. यामध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असतो.
युरिनरी ट्रॅक इंफेक्शन - मूत्रमार्गाचे इंफेक्शन दूर करण्यासाठी केळ्याचे खोड फायदेशीर ठरते. हे मूत्रल असल्याने युरिनरी ट्रॅक इंफेक्शन दूर होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम घटक हे इंफेक्शन दूर करण्यास मदत करतात.
कसा कराल केळ्याच्या खोडाचा आहारात समावेश -:
केळ्याचे खोड सोलणे, साफ करणे आणि कापणे हे काम कटकटीचे असल्याने अनेकजण ते करणे टाळतात. एकाच वेळी केळ्याचे मोठे खोड कापून ताकात भिजवून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते अधिक काळ टिकण्यास मदत होते. ताक आंबट होऊ नये म्हणून ते दर 2-3 दिवसांनी बदला.
केळ्याच्या खोडाचा रस बनवण्यासाठी -:
#1 केळ्याच्या खोडाचे काप, मीठ, भाजलेले जिरे, काळामिरी आणि दही एकत्र मिक्सरमध्ये वाटा. हे मिश्रण आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करून प्यावे. अधिक पातळ हवे असल्यास त्यामध्ये पाणी मिसळा.
#2 एक सफरचंद, कपभर भिजवलेले केळ्याचे खोड आणि कपभर पाणी मिसळून पातळ स्मुदी बनवा. हा रस गाळून त्यामध्ये बर्फाचे तुकडे मिसळून गारेगार रस प्यावा.
Reference
- Poonguzhali, P. K., & Chegu, H. (1994). The influence of banana stem extract on urinary risk factors for stones in normal and hyperoxaluric rats.British journal of urology, 74(1), 23-25.