एकाच जागी बसून डेस्क जॉब करणार्यांमध्ये शरीराची हालचाल होण्याचे प्रमाण कमीच असते. यामुळे मानेचे, पाठीचे, खांद्यांचे दुखणे वाढते. कम्पुटर किंवा लॅपटॉपचा अधिक वापर करणार्यांमध्ये सतत एका हातात माऊस असतो. यामुळे मनगटाजवळ किंवा बोटांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे भविष्यात त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच मनगटाजवळील काळा डाग ते दुखणे कमी करण्यासाठी AktivOrtho चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. जेअर्ड मुल्लर यांनी दिलेले हे खास सल्ले नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील.
1. मनगटाजवळ काळा डाग -
सतत माऊसचा वापर केल्याने हळूहळू मनगटाजवळ काळा डाग दिसायला सुरवात होते. म्हणूनच तुम्हाला उजवा हाताचा वापर करण्याची सवय असल्यास माऊस डाव्या हाताने वापरण्याची सवय लावा. यामुळे उजव्या हातावरील दाब कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचा काळवंडण्याची समस्याही कमी होते. यासोबतच तुम्ही मनगटाला पॅडीग करूनदेखील माऊस वापरू शकता.
2. कोपर्यामध्ये वेदना जाणवणे – सतत टाईपिंग केल्याने मस्क्युलर स्केलेटल बिघडण्याची शक्यता असते. यामुळे अनेकदा नकळत कोपर्यामध्ये इजा होते. तेथील नाजूक स्नायू दुखावतात. यामुळे तीव्र वेदना जाणवतात. यापासून बचावण्यासाठी कोपर्यांच्या रेषेतच कीपॅड ठेवा. किंवा किंचित खाली ठेवा.
3.हातामध्ये वेदना जाणवणे – एकाच स्थितीमध्ये फार काळ बसल्यास तुम्हांला तीव्र वेदना जाणवू शकतात. टाईपिंग किंवा माऊसच्या सततच्या वापरामुळे स्नायूंवर आलेल्या दबावामुळे वेदना वाढतात. हा त्रास टाळण्यासाठी हाताचे कोपरे डेस्कपेक्षा थोडे खाली असावेत. मात्र हात वाकवू नका. सतत माऊसचा वापर केल्याने हातात गोळा येण्याची शक्यता असते. हाताचे स्ट्रेचिंग केल्याने हे दुखणे कमी होण्यास मदत होते.
4. मानेत आणि खांद्यांवर स्टीफनेस जाणवणे – मानेच्या आणि खांद्याच्या भागाजवळ अतिरिक्त प्रमाणात ताण आणि वेदना जाणवत असल्यास तुमची बसण्याची स्थिती चूकीची असल्याचे समजावे. हा त्रास कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग करावे. केवळ मान विशिष्ट दिशेने फिरवणे यामुळे त्यावरील ताण कमी होत नाही. उलट हा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच स्ट्रेचिंग करावे. यामुळे या भागावरील स्नायू रिलॅक्स होतात. म्हणूनच पोक काढून न बसता ताठ बसावे.
5. टेन्डीनेस – स्नायूबंध म्हणजेच हाडांजवळचे नाजूक स्नायू माऊसच्या अतिवापरामुळेदेखील दुखावू शकतात. माऊसच्या वापरामुळे अंगठ्यावर आणि किपॅडच्या वापरामुळे मनगटाजवळील स्नायूबंधांवर ताण येतो. त्यामुळे बोटांवरील ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ती विशिष्ट वेळाने स्टेच करा आणि फिरवा.