Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Getty Images
उन्हाच्या कडाक्यानंतर बरसणारा पाऊस आल्हाददायक वाटत असला तरीही वातावरणातील बदल अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. पावसाळ्यात व्हायरल फिवर, सर्दी-खोकला, यासोबतच हेपिटायटीस, टायफॉईड, डेंग्यूचा धोकाही अधिक आहे.
डबकी साचून राहिल्याने डासांची पैदासही अधिक प्रमाणात होते. म्हणूनच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच डासांपासून बचाव करणे आवश्यक आहे. म्हणूनच पावसाळ्यात या आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा. (पावसाळी आजार आणि त्यांपासून संरक्षण करण्याचे काही सोपे उपाय)
- हेपिटायटीस ए आणि ई
दूषित अन्न आणि पाण्यामधून हा व्हायरल आजार पसरतो. यामध्ये शरीराचे तापमान वाढते, अंगदुखी, सांध्याचे दुखणे, भूक कमी होते, मळमळ जाणवते, उलट्या होतात. रुग्णाची त्वचा, नखं पिवळी होतात. सुरवातीच्या काही लक्षणांनंतर 4-6 आठवड्यांमध्ये ही लक्षण वाढू शकतात. हा त्रास वाढायला लागला की कावीळ शरीरात वाढायला सुरवात होते. नक्की वाचा : काविळीचा त्रास पुन्हा उलटू नये म्हणून या ’6′ गोष्टींची काळजी घ्या
- टायफाईड
टायफाईड हा Salmonellae typhi नामक बॅक्टेरियामुळे होतो. मानवी विष्ठेतून बाहेर पडणारे हे बॅक्टेरिया अन्नात किंवा पाण्यात मिळल्यास त्या दूषित घटकाच्या सेवनामुळे निरोगी व्यक्तीला त्याची बाधा होते. वाढता ताप,डोकेदुखी, डायरिया, पोटदुखी, शरीरावर लालसर रॅश ही टायफाईडची लक्षण आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात शहरी भागांमध्ये आढळणारा एक आजार म्हणजे लेप्टोस्पेरॉसिस. साचलेल्या पाण्यातून चालल्याने हा आजाराचा धोका वाढतो. उंदरांच्या विष्ठेतून पसरणारा बॅक्टेरिया मानवी शरीरावर परिणाम करतो. या आजारामध्ये तीव्र ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी,मळमळणे, उलट्या होणे, डायरिया, पोटदुखीचा त्रास वाढतो. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार घातक ठरू शकतो. या 10 टीप्सनी टाळा लेप्टोस्पारोसीसचा संसर्ग
या आजारांपासून बचाव करण्यासाठी काय करावे ?
- पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरचे खाऊ नका. कारण अशा ठिकाणच्या पदार्थांमध्ये कुठचे पाणी वापरले असेल याची खात्री देता येत नाही. तसेच स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही.
- डेंग्यूच्या आजारामध्ये पुरेशी काळजी घेणे, डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे हाच एक सुरक्षित पर्याय आहे. स्वतः कोणत्याही प्रकारची औषध घेऊ नका. त्यामधील गुंतागुंत वाढू नये म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार घ्यावेत.
- रस्त्यावर तयार होणारी आईस्क्रिम खाणे टाळा. दूषित पाण्याचा वापर केला असल्यास टायफाईडचा धोका वाढतो.
- साचलेल्या पाण्यामधून चालणे टाळा. तशाप्रकारची वेळ आल्यास घरी गेल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. पायांची बोटं नीट स्वच्छ करा.
With inputs from: SRL diagnostics.