पुरणाची पोळी असो, मऊ खिचडी भात असो किंवा अगदी उकडीचा मोदक किंवा शिरा… या सार्या गोडाच्या पदार्थांची खरी लज्जत वाढते ती साजूक तुपाने. पचायला हलके आणि मंद सुगंधाचे साजूक तूप हे भारतीय आहारातील एक अविभाज्य घटक आहे. तूपाबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहे. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणारे अनेक जण ते आहारात टाळतात. परंतू साजूक तूप वजन घटवण्यास मदत करतात. सोबतच सौंदर्य सुधारण्यासही तूप फायदेशीर ठरते.
- तुपाचे फायदे -:
तूपाशिवाय काही अस्सल भारतीय पदार्थ हे अपूर्णच वाटतात. यामुळे पचनमार्गाचे कार्य सुधारते. सोबतच त्यातील अॅन्टीऑक्सिडंट घटक, आरोग्यदायी फॅट्स आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पण आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या तूपात भेसळ असण्याची शक्यता अधिक असल्याने ते आरोग्यदायी ठरेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ही मनातील शंका दूर करण्यासाठी तूप घरीच बनवण्याचा पर्याय निवडणे अधिक गुणकारी ठरते.
घरी तूप बनवणे का आहे फायदेशीर ?
बाजारात उपलब्ध असलेल्या साजूक तूपामध्ये डालडा किंवा अॅनिमल बॉडी फॅट याने मिसळ केलेली असू शकते. आणि ही मिसळ पटकन ओळखणे शक्य नसते. त्यामुळे साजूक तुपाची फसगत ही आरोग्यावर अधिक घातक ठरते. त्यामुळे घरगुती तूप हे स्वच्छ्तेच्या आणि आरोग्याच्यादृष्टीनेदेखील सुरक्षित आणि फायदेशीर ठरते.
- तूप बनवण्याचे प्रकार -:
घरगुती तूप हे दोन प्रकारे बनवता येते. लोण्यापासून तूप बनते. त्यामुळे लोणी कशापासून बनवले आहे त्यावर तूप बदलते. एका प्रकारामध्ये दह्यावरील मलईने लोणी बनवले जाते. तर काहीजण दूधाच्या मलईपासून लोणी बनवतात. फॅट कमी केलेले दूधही काही जण वापरतात. यासाठी नियमित मलई साठवून ठेवणे गरजेचे आहे. मलई नसल्यास अनसॉल्टेड बटरपासून तूप बनवता येते.
कसे बनवाल तूप ?
साहित्य – :
- मलईसाठी एक डब्बा
- गाळणी
- तूप गरम करण्यासाठी पातेले
- लोणी घुसळण्यासाठी पातेलं
- तूप साठवण्यासाठी भांड
कृती :
# तूप बनवणे हे सोपे आहे. पण त्यासाठी पुरेशी पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तूप बनवण्यासाठी दही आणि दूधावरची मलई नियमित काढून हवाबंद डब्ब्यात साठवून ठेवा. तो डबा नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. अन्यथा मलई खराब होईल.
# पुरेशी मलाई साठल्यानंतर ( मलईच्या निम्मे तूप बनते) ते मोठ्या भांडयात काढूब ठेवा.
# मलई रवीने घुसळा. हळूहळू त्यावर लोणी साठायला सुरवात होईल. लोणी चमच्याने बाजूला काढा.
# लोणी काढलेले पातेले गॅसवर ठेवा. त्यातील फॅट हळू हळू वितळेल. त्याचा रंग़ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवावा. दरम्यान चमच्याच्या सहाय्याने मिश्रण हलवत रहा.
# त्यानंतर तूप गाळून घ्या. ते तूप स्टीलच्या भांड्यात साठवा.