April 7th is World Health Day and theme for this year is ‘Halt the Rise: Beat Diabetes’
मधूमेह हा सायलंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार आहे. म्हणूनच त्याचे निदान करण्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक आहे. परंतू अनेकजण आजाराच्या भीतीनेच त्यापासून दूर पळतात आणि यामधील गुंतागुंत अधिक वाढते. मधूमेहाकडे दुर्लक्ष केल्यास एकातून अनेक शारिरीक व्याधी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच त्याबद्दलचे काही समज- गैरसमज दूर करण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे व विझडम क्लिनिकचे कन्सल्टंट डॉ. नितीन पाटणकर यांनी तुमच्या आमच्या मनातील काही शंका / प्रश्नांना दिलेली ही उत्तरं मधूमेहाविषयीची भीती कमी करण्यास नक्कीच मदत करतील.
#1 मधूमेह केवळ ठराविक लोकांना होतो -:
मधूमेह हा अनुवंशिक आजार आहे. मुळात त्याचे टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार असतात. टाईप 1 डाएबीटीज हा लहान मुलांमध्ये आढळतो. ज्यामध्ये जन्मापासून इन्सुलिनच्या पेशींच्या विरुद्ध काम करणार्या अॅन्टीबॉडीज नष्ट झाल्याने इन्सुलिनच्या निर्मितीचे काम मंदावते. परिणामी जो डाएबिटीस होतो तो टाईप 1 डाएबिटीज. तर टाईप 2 डाएबिटीज हा मोठ्यांमध्ये आढळतो. ज्यामध्ये इन्सुलिनच्या निर्मितीचे कार्य चालू असते पण सगळ्या टीश्यूंमध्ये त्याचे पुरेसे कार्य होत नाही. इन्सुलिनचा आवश्यक आणि पुरेसा पुरवठा न झाल्याने साखर नियंत्रणामध्ये राहत नाही. हळूहळू इन्सुलिन कमी पडायला लागतं पण नाहीसं होत नाही तो टाईप 2 डायबेटीस.
रक्ताच्या चाचण्यांमधून, त्यातील साखरेतील प्रमाणामधून मधूमेहाचे निदान केले जाते. टाईप 1 डाएबिटीजचे निदान करण्यासाठी अॅन्टीबॉडीजच्या संख्येवरून निदान करता येते. मग तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
#2 मधूमेहींना विशेष डाएबेटीक डाएटची गरज असते -:
मधूमेहींसाठी डाएट हा महत्त्वाचा भाग असला तरीही केवळ डाएटमुळे शुगर कंट्रोल करता येते असे नाही. शरीरात इन्सुलिन किती तयार होते यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे मधूमेहींच्या आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट यांचे योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट हे अचूक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. तसेच त्याची क्वॉलिटीदेखील प्रमाणात ठेवून किती कॅलरीज मिळतात याकडे लक्ष द्यावे लागते. त्यानुसार डाएट प्लॅन करावे लागते.
प्रोटीन निवडताना सारी अमायनो अॅसिड आहारात येतील असे घटक म्हणजे अंड, चिकन किंवा डाळ-पोळी आणि दही असे काही घटक एकत्र करूनदेखील आहारात त्याचा समावेश करू शकता. त्यामुळे पटकन शरीरात साखर वाढणार नाहीत अशी फूड कॉम्बिनेशनस स्मार्टली निवडणं मधूमेहींसाठी आवश्यक आहे.
#3 फळं हा आरोग्यदायी पर्याय आहे -:
फळातून फ्रुक्टोज ही साखर मिळते त्याबरोबरच अनेक प्रकारची व्हिटामिन्स मिळतात. पण केवळ फळं खाल्ली तर साखर नक्कीच वाढणार. त्यामुळे व्यक्तीनुसार आवश्यक असणार्या कॅलरीजच्या गरजेइतकाच फलाहार घेणे हितकारी आहे. त्यामुळे केवळ फळं खाऊन चालत नाही. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत.यादिवसात सर्रास आढळणारा उसाचा रस प्यायल्यास पटकन साखर वाढू शकते. यासोबतच बाजारात मुबलक उपलब्ध असणार्या आंब्याचा मोहदेखील आवरत नाही. पण एखाद – दुसरी आंब्यांची फोड आहारात घेणे ठीक आहे. परंतू त्यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. आंब्याच्या फोडी खायच्या झाल्यास दोन पोळ्या कमी खा, सुरवातीला आहारात भरपूर कच्च्या भाज्यांचा समावेश करा. म्हणजे आंबा खाल्ल्याने अचानक साखर वाढणार नाही.
#4 मधूमेहींनी भात खाऊ नये -:
भात जितका शिजवाल तितका तो पचायला हलका आणि त्यातील साखर अधिक पटकन शरीरात शोषली जाते. पोळीमध्ये तितक्याच कॅलरीज असतात. पण पचायला जड असल्याने शरीरात कॅलरीज हळूहळू जातात. त्यामुळे पोळीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ( नक्की वाचा :तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती कॅलेरिज असतात ?)परंतू ज्यांना भात खायचा आहे त्यांनी सोबत पुरेशा कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करणे देखील आहे. 2 मोठे चमचे भात असेल तर त्यासोबत 2 वाट्या भाज्या तुमच्या आहारात असतील तर ते त्रासदायक ठरणार नाही. मधूमेहींसाठी किंचित कमी शिजवलेला किंवा ब्राऊन राईसचा पर्याय अधिक उपयोगी ठरू शकतो.
#5 साखरेऐवजी मध,गूळ किंवा शुगर फ्री वापरावे -:
मधूमेहींच्या आहारात दिवसभरात 2 चमचे साखर खाणे प्रमाणात समजले जाते. परंतू एकाचवेळी सारी साखर खाणे त्रासदायक ठरू शकते. गूळ, मध हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी स्वरूपातील साखर असली तरीही प्रमाणापेक्षा अधिक शरीरात गेली तर ती त्रासदायकच ठरणार. साखरही शरीरात किती पटकन शोषली जाते यावर त्याचा त्रास अवलंबून ठरतो. तूप-साखर दूधातून घेतल्यास इतर मार्गांपेक्षा हळू शोषली जाते. त्याचप्रमाणे शुगर फ्री देखील असते. त्यामधून मिळणार्या कॅलरीज कमी असल्याने भरपूर शुगर फ्री आहारात घेणे साखरेइतकेच त्रासदायक ठरते. नक्की वाचा : मधुमेहींनी साखरेऐवजी ‘मध’ खावे का ?
#6 मधूमेहाचे निदान झाले म्हणजे सारे संपले -:
मधूमेह ही एक कंडीशन आहे. त्यावर ठोस उपायांनी मात करता येत नसली तरीही नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे मधूमेहींनी आपले जीवन वैराण समजण्याची काहीच गरज नाही उलट इतरांपेक्षा खाण्यावर, आरोग्यावर थोडी अधिक बंधन घालून सजगतेने नियंत्रण मिळवणे अगदी शक्य आहे. त्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर रक्ताची चाचणी करण्यापेक्षा दर तीन महिन्यांनी नियमित तपासणी करा. योग्य आहारासोबत व्यायामांचा, योगासनांचा दैनंदिन दिवसात समावेश करा.