छायाचित्र सौजन्य – PIB/ Twitter account
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची गेल्या वर्षभरातील कार्यतत्परता आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रवाशांशी वाढलेला कनेक्ट पाहता रेल्वे बजेट 2016 कडून भारतीय प्रवाशांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. सुरेश प्रभूंच्या दुसर्या रेल्वे बजेटच्या पेटार्यातून सामान्य प्रवाशांचे त्रास कमी करण्याचा त्यांचा मानस होता. रेल्वे बजेट 2016 मध्ये केलेल्या घोषणा पाहता लाखो प्रवाशांसाठी लाईफलाईन असणार्या रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्याकडे सुरेश प्रभूंनी अधिक दिले आहे. प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यामधील संवाद वाढवून प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक आनंददायी करण्यावर सुरेश प्रभूंनी भर दिलेला आढळून आला आहे.
रेल्वे प्रवासामध्ये सुरक्षितता आणि स्वच्छता वाढवणे हे प्रवाशांच्या आनंददायी अनुभवासाठी गरजेचे होते. त्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची ‘रेल्वे अर्थसंकल्प 2016′ मध्ये केलेल्या खास तरतुदी -:
#1 ‘मिशन झिरो अॅक्सिडंट -:
मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसात अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. अपघात कमी करण्यासाठी सुरेश प्रभूंनी ‘मिशन झिरो अॅक्सिडंट’ आखले आहे. तसेच रेल्वेतील गर्दीचे प्रमाण पाहता राज्यसरकारला कामाच्या वेळा बदलण्याबाबत आवहन करण्यात येणार आहे. मंबईत प्लॅटफॉर्मची उंची वाढवली जाणार आहे.
#2 महिलांची सुरक्षा -:
महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ’182′ ही 24 तास हेल्पलाईन कार्यरत राहील. तसेच सीसीटीव्हींची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी अधिक लो बर्थ आरक्षित ठेवले जातील. तिकीटांच्या आरक्षणांमध्ये 33% कोटा हा महिलांसाठी आरक्षित राहील.
#3 ‘क्लीन माय कोच’ सुविधा -:
लांब पल्ल्ल्याचा रेल्वेप्रवास अधिक सुखकारी करण्यासाठी ‘क्लीन माय कोच’ ही नवी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यानुसार प्रवासादरम्यान तुमच्या डब्ब्यात कचरा आढळल्यास किंवा स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आढळल्यास प्रवाशांनी एसएमएसद्वारा प्रशासनाला त्याबाबत माहिती दिल्यानंतर स्वच्छतेसाठी कर्मचारी पाठवले जातील.
#4 जननी सेवा -:
लहान मुलांना किंवा नवजात बालकांना घेऊन रेल्वेप्रवास करणे सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासन स्टेशनवर गरम पाणी, गरम दूध तसेच बेबी फूड उपलब्ध करून देणार आहे. तसेच नवजात बालकांचे डायपर बदलण्यासाठी रेल्वेत टेबल उपलब्ध होणार आहे.
#5 बायो टॉयलेट्स -:
रेल्वेमध्ये मलमुत्र विसर्जनाच्या सद्ध्याच्या सोयीमुळे रेल्वेत पसरणारा दुर्गंध तसेच रेल्वे ट्रॅकवर जमा होणारी घाण अस्वच्छता वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे रेल्वेत मल मूत्र विसर्जन बंद करून रेल्वे स्टेशनसोबतच रेल्वेतही बायो टॉयलेट्सची सोय उपलब्ध केली जाणार आहेत. यासोबतच बायो व्हॅक्युम टॉयलेट्स अअणि कचरापेट्या उपलब्ध होतील.
#6 सारथी सेवा -:
कोकण रेल्वेमध्ये अपंग आणि वयोवृद्ध प्रवाशांची ने -आण करण्यासाठी सारथी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यानुसार त्यांना पिक अप – ड्रॉप सेवा उपलब्ध राहील. तसेच अपंगासाठी व्हिलचेअरचे ऑनलाईन बुकींग करता येईल.
#7 स्वच्छ पाणी -:
प्रवाशांना स्टेशनवर स्वच्छ पाणी उप्लब्ध करून देण्यासाठी वॉटर बॉटल वेन्डींग मशीन उपलब्ध होतील.
#8 स्वच्छ आणि सुरक्षित अन्न -:
रेल्वे प्रवासादरम्यान उपलब्ध होणारे अन्न सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी IRCTC द्वारा पदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना स्थानिक आणि लोकप्रिय पदार्थांची चव चाखता यावी यासाठी विविध पदार्थ उपलब्ध केले जाणार आहेत.