Read in English
Translated by Sushantdeep Sagvekar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock
उन्हाळ्याच्या दिवसात थंड आणि हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी पिणे सोयीचे असते. पण आरोग्याच्या दृष्टीने पाण्याच्या तापमानाचा स्वास्थ्य सुधारण्यासाठी फायदा होतो. म्हणूनच आहारतज्ञ डॉ. नेहा संवल्का यांच्याकडून जाणून घ्या नेमके ऋतूमानानुसार पाणी कसे प्यावे ?
डॉ. नेहा संवल्का यांच्यानुसार गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते आणि उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने उष्माघाताचा त्रासही कमी होतो. तर हिवाळ्यात सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाणी पिणे हिताचे ठरते.
गरम पाणी पिण्याचे फायदे:
पचनशक्ती सुधारते: आयुर्वेद आणि प्राचीन चीनी वैद्यशास्त्रानुसार सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे पचनशक्ती सुधारते तसेच अपचन होत नाही. गरम पाणी प्यायल्याने आतड्यातील रक्तप्रवाह सुधारतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
शरीर डिटॉक्सिफाई होते: तुम्हाला माहित आहे का गरम पाणी प्यायल्याने शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे फक्त पित्तच कमी होते असे नाही, पण पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्याही दूर राहतात. या उपायाला अधिक प्रभावशाली करण्यासाठी कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून नियमित प्यावा. यासोबतच मध– लिंबुपाण्याचे मिश्रण हे उत्तम वेट लॉस ड्रिंक आहे.
बंद नाक मोकळे होण्यास मदत मिळते: कोमट पाणी प्यायल्याने बंद नाक आणि घशाची खवखव कमी होते. कोमट पाणी हे कफाचा त्रास कमी करण्यास मदत करते. हे नक्की वाचा ‘जलनेती’- श्वसनविकारांना दूर करणारा घरगुती उपाय
वेदना कमी करते: कोमट पाणी प्यायल्याने दुखणाऱ्या पेशीला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे ते नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करते. वारंवार गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास किंवा पाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते.
थंड पाणी पिण्याचे फायदे:
व्यायामानंतरचे उत्तम पेय: व्यायाम केल्यानंतर शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी थंड पाणी प्यावे.
हिट स्ट्रोक कमी करते: डॉ. नेहा यांच्यामते उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हितकारी आहे. कोमट पाण्याच्या तुलनेत शरीर थंड पाणी लवकर शोषून घेते. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरुन घरी आल्यावर किंवा उष्माघाताचा त्रास होत असल्यास थंड पाणी प्यावे. मात्र फ्रिजमधील थंड पाणी थेट पिऊ नये.
वजन कमी करण्यास मदत करते: वजन कमी करण्याचे महत्त्वाचे तत्व म्हणजे मेटाबॉलिजमला चालना देऊन कॅलरीस बर्न करणे. डॉ. नेहांच्यामते थंड पाणी पिणे आणि थंड पाण्याने अंघोळ केल्याने मेटाबॉलिजमला चालना मिळते.
थंड पाणी की गरम पाणी – कोणते पाणी आरोग्यासाठी चांगले आहे?
पारंपारिक चीनी वैद्यशास्त्र आणि आयुर्वेदानुसार थंड पाणी पिऊ नये कारण थंड पाणी प्यायल्याने स्नायू आकुंचित होतात. कोमट पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरातील अवयवांचे कार्य सुधारते. याकारणांमुळे हेल्थ प्रोफेशनल्स निरोगी आरोग्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचप्रमाणे कडक उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान लवकर कमी करण्यासाठी थंड पाणी प्यावे.
ग़रम पाणी किंवा थंड पाणी केव्हा पिऊ नये ?
प्रत्येक नियमाला अपवाद हा असतो, म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा.
थंड पाणी
डॉ. नेहाच्या मते, ‘जेवताना थंड पाणी पिऊ नये. जेवणानंतर किंवा जेवताना थंड पाणी प्यायल्याने शरीर अधिक ऊर्जा खर्च करुन त्याचे तापमान वाढवते. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
कोमट गरम पाणी
व्यायामानंतर कोमट गरम पाणी पिणे टाळा. डॉ. नेहांच्यामते तुमच्या शरीराचे तापमान व्यायामानंतर वाढलेले असते, थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.