Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून अनेकींना प्रेरणा देणार्‍या उज्ज्वला राजेंचा कणखर प्रवास !

$
0
0

ऑक्टोबर – ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मन्थ ! 

आजकाल धकाधकीच्या जीवनात गुणी मुलगी, संस्कारी सून, आदर्श पत्नी आणि दक्ष आई म्हणून जगताना ‘ती’ कळत-नकळत स्त्री म्हणून  स्वतःकडे पहायला विसरते. काळाच्या झपाट्यात कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा विळखा अधिकच घट्ट होतोय. आज जगभरात कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे 50 % टक्के आहे. यामागील एक प्रमुख कारणं म्हणजे उशीरा झालेले कॅन्सरचे निदान ! कायमच घर-परिवाराला स्त्रिया प्राधान्य देतात आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात ही स्त्री-जीवनातील प्राथमिकता दूर करणे गरजेचे आहे. यासाठीच ब्रेस्ट कॅन्सरवर सक्षमतेने मात केल्यानंतर स्त्रीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सोबतच आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी उज्ज्वला संजीव राजे यांनी ‘द पिंक  इनिशिएटीव्ह’ या संस्थेची ( एनजीओ) स्थापना केली.  मग कणखरतेने ‘कॅन्सर’चा सामना करणार्‍या उज्ज्वला राजेंचा प्रेरणादायी प्रवास थोडा विस्ताराने जरूर जाणून घ्या…

अभ्यास, आई आणि स्वतःच्या माध्यामातून आयुष्यात आला ‘कॅन्सर’

  १९९७-९८ च्या दरम्यान प्रोजेक्टच्या माध्यमातून Neutaceuticals (न्युटॅसेटिकल्स) वर संशोधन करुन हाय प्रोटीन प्राॅडक्टस् बनवताना उज्ज्वलांचा ‘कॅन्सर’ याविषयाशी पहिला संबंध आला. या निमित्ताने त्यावर अभ्यास करण्याचा योग आला. केमोथेरपी दरम्यान शरीरातील अनेक चांगल्या पेशीदेखील मृत पावतात. अशावेळी प्रोटीन शरीरातील  कमजोरी दूर करण्यास कशाप्रकारे मदत करू शकेल याविषयावर त्यांचा बराच अभ्यास झाला होता.  मात्र त्यावेळी हा दुर्धर आजार आपल्या उंबर्‍याशी येऊन ठेपलाय याबाबत त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. पुढील दोन वर्षातच त्यांच्या आईला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आणि हा आजार आपल्या किती नजिक आला आहे याची त्यांना जाणीव झाली. उशिरा निदान झालेल्या या आजारामुळे तसेच मानसिक धैर्य कमजोर पडल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करुनदेखील आपण आईला यातून वाचवू शकलो नाही ही सल त्यांच्या मनात कायमच होती.
                                                        कॅन्सर जडण्यामागे 6-8 % अनुवंशिकता हे देखील एक कारणं आहे. ही माहिती असल्याने त्यांनी मॅमोग्राफी करून घेतली. यामधून त्यांना कोणतेही ठळक लक्षणं नसतानादेखील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. पण आता हिंमत हरण्यापेक्षा मानसिक धैर्य एकवटून लढण्याची गरज असल्याचे त्यांनी मनात ठाम ठरवले आणि सक्षमतेने सारे उपचार पूर्ण केले.
योग्य डॉक्टर आणि घरातल्यांच्या साथीने मिळाले बळ 
कॅन्सरसारख्या आजाराबाबत मनात भीती आणि नकारात्मक विचारच अधिक असल्याने आजुबाजूला सकारात्मकता असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी योग्य उपचार, डॉक्टर आणि घरातल्यांची साथ असणेदेखील गरजेचे आहे.  मला डॉ. सुमीत शहा यांसारखे डॉक्टर भेटले हे माझे भाग्यच होते. असे उज्ज्वला सांगतात. उपचारादरम्यान माझ्यासोबत होणार्‍या सार्‍या गोष्टींची माझ्यासोबतच घरातील व्यक्तींनादेखील पुरेशी माहिती  होती. त्यामुळे घरात काम करणार्‍या बाईने माझ्या खाण्यापिण्याच्या पथ्याकडे लक्ष दिले. त्यात माझ्यानुसार बदल केले. तर माझी नऊ वर्षांची मुलगी माझ्या जगण्याची प्रेरणा होती.  माझ्या जीवनाचा जमा-खर्च काढल्यास आर्थिक बळ, घट्ट मन सोबतच माझी सपोर्ट सिस्टीम मजबूत असल्याने मी कॅन्सरशी अधिक सक्षमतेने लढू शकले.
त्रासदायक केमोथेरपीला मन घट्ट असणे गरजेचे  
केमोथेरपी ही त्रासादायक उपचार पद्धती असल्याने त्यामुळे खूप लवकर थकवा येतो, केस गळतात, तुमच्या दिसण्यात फरक जाणवतो त्यामुळे मन घट्ट करणे  गरजेचे होते. माझ्या आठही केमोथेरपी या थेट नसांमधून घेण्याचा मी निर्णय घेतला होता. त्यासाठी मनाने मजबूत असणं फार गरजेचे होते. तसेच केमोथेरपी दरम्यान मी कामदेखील करत होते. केमोथेरपीनंतर एक दिवस घरातून काम केल्यानंतर दुसर्‍यादिवशी मी पुन्हा कामावर रुजू होत असे.
                                               केमोथेरपी त्रासदायक असल्याने प्रत्येकाला यादरम्यान काम करणे शक्य होईलच असे नाही. त्यासाठी मानसिक तयारीसोबतच तुमची प्रकृतीदेखील मजबूत असणे गरजेचे आहे.
माझ्यासाठी मुलीने केलं तिच्या बाप्पाशी डील 
केमोथेरपीमध्ये माझे केस जाणार हे मला ठाऊक होते. त्यामुळे लांबसडक केस कापून मी ते खांद्यांपर्यंत केले. तसेच बाह्यस्वरूपापेक्षा मी आजारातून बाहेर पडणं अधिक गरजेचे होते. त्यामुळे माझ्यासोबतच माझे कुटुंबीय यासाठी तयार होते.  माझ्या नऊ वर्षांच्या मुलीने चक्क  देवाशी डील केलं होतं. तिच्यामते , आईने बाप्पाकडे जाऊन तिला त्रास देण्यापेक्षा माझ्याजवळ राहून मलाच त्रास देऊ दे.  तिला माहीत होतं आईचे केस जाणं हे उपचाराचा एक भाग आहे. आणि त्यानंतर ती ठीकही होणार आहे. अशी एक हळवी आठवण उज्ज्वला यांनी आमच्यासोबत शेअर केली.
‘ दी पिंक इनिशिएटीव्ह’ नवी सुरवात  
माझ्या आईच्या जाण्यामध्ये ‘दी पिंक इनिशिएटीव्ह’ या संस्थेची बीजं रोवली होती. या संस्थेद्वारे जनजागृतीचे काम केले जाते. अपुरी माहिती, भीती, लज्जा यामुळे स्त्रिया मॅमोग्राफी करायला जात नाही. स्त्रियांमध्ये याआजाराबाबत पुरेशी जागृती नसल्याने निदान करण्यास उशिर होतो. परिणामी त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या नियमानुसार तुमचे आरोग्य चांगले राहिल्यास तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे जीवन जगू शकता. त्यामुळे शरीराकडून मिळणार्‍या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनांचा कॅन्सर वेळीच ओळखणे शक्य आहे. त्यामुळे चाळीशी ओलांडलेल्या प्रत्येक स्त्रीने न चुकता मॅमोग्राफी करावी. तर पंचविशी पार केलेल्या स्त्रीने दर महिन्याला पाळीच्या पाचव्या दिवसानंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झाम करणे गरजेचे आहे.
संबंधित दुवे - 

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>