चैत्र महिन्यात येणाऱ्या रामनवमीला आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो. परंतु, सुंठवडा देण्यामागचे नेमके कारण काय? तो चिमूटभरच का दिला जातो? त्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत का ? आपल्या या प्रश्नांवर ठाण्याच्या आरोग्यधाम हॉस्पिटलच्या मेडीकल डायरेक्टर आणि आयुर्वेदीक स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
रामनवमी व हनुमान जयंती चैत्र महिन्यात येते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात. याचे कारण म्हणजे शरीरात न पचलेला भाग शरीरात काही इम्मफ्लामेंटरी बदल घडवून आणतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.
आलं वाळवलं की सुंठ बनतं. आलं उष्ण आहे. ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो. म्हणून एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. सुंठाला ‘विश्वा’ असं दुसरं नाव आहे. अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला ‘विश्वऔषध’ असे म्हणतात.
सुंठाचे फायदे:
कंबरदुखी, आमवात, संधीवात यावर सुंठ उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या वेळेस उद्भवणारी पोटदुखी आणि प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वावस्थेत आणण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. तसंच नैराश्य येणं, भीती वाटणं, आत्मविश्वासाची कमतरता यांसारखे मानसिक त्रास होऊ नयेत म्हणून देखील सुंठ फायदेशीर आहे.
सुंठ किती प्रमाणात खावे?
सुंठाचा शरीरावर होणारा परिणाम गोड असला तरी सुंठ उष्ण असल्याने ते कमी प्रमाणात खावे. पित्त व उष्ण प्रकृती असलेल्यांना सुंठ फार सहन होईल असे नाही म्हणून त्यांनी सुंठ साजूक तुपासोबत खावे. गर्भाशयाच्या दुखण्यासाठी सुंठ एरंडेल तेलासोबत घेतात. उष्ण प्रवृत्ती आहे पण संधीवात कमी करायचा असल्यास सुंठ तुपासोबत घ्यावी. आपण सुंठ कशाबरोबर खातो यावरून त्याचा परिणाम ठरत असतो. शरद व ग्रीष्म ऋतूत म्हणजेच ऑक्टोबर आणि मे महिन्यात सुंठ खाऊ नये, असा सल्ला डॉ. कुलकर्णी देतात.
सुंठवडा कसा बनवावा?
१० ग्रॅम सुंठ तुपावर परतून त्यात वेलची, जायफळ. चारोळी, केशर घालून १० दिवस सकाळी घेतल्यास मानसिक आरोग्य सुधारते.
तसंच सुंठवडा बनवण्यासाठी सुंठ, खोबरं, खडीसाखर भाजून मग बारीक वाटून घ्या. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही त्यात खसखस घालून व्हेरिएशन आणू शकता.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock