चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासुन हिंदू नववर्षाची सुरूवात होते. प्रसन्न वातावरणात , गोडा-धोडाच्या जेवणात , नव्या कपड्यांच्या संगतीने जल्लोषात हा सण साजरा केला जातो. मात्र केवळ नववर्षापुरतीच ‘गुढीपाडव्या’चे मह्त्त्व मर्यादीत नसून निसर्गातदेखील याकाळात बदल होत असतो. बहरणार्या वसंत ऋतुत झाडावेलींची पालवी नव्याने बाळसं धरत असते.
मग असे सारे आनंदाचे , चैतन्याचे वातावरण असताना त्यात कडुलिंबाची कटुता कशाला ? हा प्रश्न तुमच्याही मनात डोकावला असेल ना? मग
- गुढीपाडव्याला ‘कडूलिंब’ का खातात ?
होळीचे दहन झाल्यानंतर , वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरण बदालाच्या काळात कांजण्या , गोवर यासारखे त्वचेचे विकार, पोटाचे विकार , सर्दी- पडशांसारखे लहान सहान विकार फोफावण्याची शक्यता असते. मग अशावेळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीराचे स्वाथ्य राखण्यासाठी नववर्षाची सुरूवात कडूलिंबाच्या सेवनाने करतात.
- ‘कडूलिंबा’चे औषधी गुणधर्म -
- कडूलिंबातील ‘प्रोटिन’ घटकांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर रोगापासून बचाव होतो.
- कडूलिंबातील अॅन्टीवायरल ,अॅन्टीबॅक्टेरियल व अॅन्टीफंगल गुणधर्म त्वचाविकार व जंतूसंसर्गापासून बचाव करतो.
- अपचन , पित्त, गॅसेस यासारख्या समस्यांमध्ये कडूलिंब परिणामकारक गुण देतात.
- मधुमेहींना , कडुलिंबाच्या सेवनाने रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.
- केसांच्या समस्या दूर ठेवण्यासाठी कडुलिंब मदत करते.
- पाडव्याला कसा खाल ‘कडुलिंब’?
कडूलिंब इतका बहुगुणी असेल तर निरोगी आरोग्यासाठी एक ‘कडू घोट’ घ्यायलाच हवा ना .. ? मग चवीला कडवट असणारा कडूलिंबाचा पाला थोडा चविष्ट करून खा.
कोवळ्या कडूलिंबाच्या पानाचे बारीक तुकडे करून त्यात मिरपुड, हिंग, मीठ, गुळ , खोबर्याचा किस ,जिरे व थोडा कैरीचा किस एकत्र करून खा.
- संबंधित दुवे -
गुढीपाडवा विशेष आरोग्यदायी पदार्थ - ‘गुलकंदी श्रीखंड’
छायाचित्र सौजन्य – Getty Images