साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे ‘गुढीपाडवा’ …. आणि पाडवा म्हणजे श्रीखंड आलचं. तुम्ही केशर, वेलची,आम्रखंड हे सारे चाखून पाहिले असेल पण ‘गुलकंदी श्रीखंड ‘कधी खाल्लयं का? मग यंदाच्या पाडव्याला करुन पहा हेल्दी आणि टेस्टी ‘गुलकंदी श्रीखंड’
गुलकंदी श्रीखंड
- साहित्य:
चक्का , पिठीसाखर दीड वाटी, दोन चमचे गुलकंद, वेलची पावडर , सजावटीसाठी काजू ,बदामची पूड व बेदाणे
चक्का घरी करण्यासाठी -
घरी काचेच्या किंवा चीनी मातीच्या भांड्यात एक लीटर दुधात दही टाकून विरजण लावावे. दही तयार झाल्यानंतर मलमलच्या कापडात दही बांधून ठेवावे. किमान 3-4 तास किंवा रात्रभर घट्ट बांधलेले दही टांगून ठेवावे. म्हणजे पाणी निघून जाईल व कोरडा चक्का मिळेल.
( श्रीखंड निर्मितीसाठी उत्तम प्रकारचे दही जमणे आवश्यक आहे.म्ह्णून दूध हे चांगल्या प्रतीचे व उकळून घ्या. दुधात जिवाणू संख्या अधिक असल्यास दही घट्ट जमत नाही. परिणामी, होणाऱ्या श्रीखंडामध्ये पाणी सुटण्याची शक्यता असते. )
- कृती :
चक्का व साखर परातीमध्ये एकत्र करून हाताने चांगले फेटून घ्या. किंवा मिक्सर अथवा बारिक चाळणीतून काढून घ्या. म्ह्णजे त्यातील बारीक बारीक गुठळ्या मोकळ्या होतील.
आता त्यात गुलकंद, वेलची पूड ,सुकामेवा व बेदाणे घालून एकत्र करा. म्हणजे तुमचे ‘गुलकंदी श्रीखंड’ तयार !
गुलकंद हा आरोग्यासाठी शीतदायी असल्याने शरीरात वाढणार्या उष्ण्तेला कमी करतो. मग यंदाच्या पाडव्याला करून पहा चवीष्ट आणि आरोग्यदायी ‘गुलकंदी श्रीखंड’ .
पाडव्याला श्रीखंडावर ताव माराल पण कडूलिंबाचे पानंही खायला विसरू नका. ( गुढीपाडव्याला ‘कडूलिंब’ का खातात ? )
छायाचित्र सौजन्य – Shutterstock Images