कामाच्या डेडलाईन्स, वेळेवर ऑफिसमध्ये पोहचण्याची धावपळ असे अडथळे पार करून आज 9.30 ते 10 च्या दरम्यान फेसबूकवर असणार्या अनेक संगीतप्रेमींसाठी आजची सकाळ स्पेशल होती. अशांपैकी मी एक ! आज सकाळी पहिल्यांदा शंकर महादेवन फेसबूकवर ‘लाईव्ह’ इंटरव्ह्यू करत होते. संगीत आणि सिनेक्षेत्रात शंकर-एहसान-लॉय या त्रिकूटाने कायमच दर्जेदार आणि प्रसिदध गाणी दिली. पण कलाकाराव्यतिरिक्त त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाबद्दलही,आवडीनिवडीबाबत शंकरजींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
कट्यार…. च्या उत्तुंग यशानंतर मराठी रसिक आणि शंकरजी अधिक जवळ आले. मात्र दरम्यान त्यांच्या आजारपणाची आलेली बातमीमुळे अनेक रसिकांमध्ये चिंता निर्माण करून गेली. पण फेसबूक लाईव्ह कार्यक्रमामध्ये शंकरजींनी आरोग्याबाबत काही खुलासे केले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी अचानक विमानतळावर शंकरजींना अस्वस्थ्य वाटल्याने तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ‘आम्हा केरळी,मल्याळी लोकांच्या हृद्यवाहिन्या जरा लहानच असतात असे डॉक्टर म्हणतात’ असे शंकरजी मजेत म्हणाले. परंतू थट्टेचा विषय बाजूला ठेवल्यास हृद्यविकाराचा त्रास हा महादेवन कुटुंबामध्ये अनुवंशिक आहे तसेच स्थुलता हा देखील एक भाग असल्याने शंकरजींना हा त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले . (नक्की पहा : हृद्याचं आरोग्य सुधारणारी ’11′ हेल्दी ड्रिंक्स ! )
शंकर महादेवन कोणती काळजी घेतात ?
शंकर महादेवन अॅन्जिओप्लास्टीनंतर आरोग्याबाबत अधिक दक्ष झाले आहेत. चालण्याचा व्यायाम हा त्यांच्यासाठी गरज झाला आहे. त्यामुळे ते नियमित खूप चालतात. शंकरजी खवय्ये आहेत त्यामुळे डाएट हे जाचक वाटत असले तरीही त्यांच्या खाण्याच्या सवयींवर बंधन आली असल्याचे ते सांगतात. काही किलो वजनही घटवले आहे. पण या अचानक आलेल्या आजारपणामुळे मला ‘ हरपल यहा, जिभर जियो… जो हे समा कल हो ना हो … ‘ या गाण्याची / शब्दांची अधिक जवळून किंमत समजली. आरोग्याला गृहीत धरू नका. माझ्यासाठी हे आजारपण जीवनाला वळण देणारा क्षण होता. या आजारपणामुळे मला माझ्या जवळच्या लोकांची, आयुष्याची खरी किंमत कळाली. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, पण आरोग्याचाही विचार करा. कारण तुम्ही उद्याचा दिवस पहाल की नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.
शंकर महादेवन यांनी केलेल्या इतर काही खुलासांबाबत आणि सविस्तर मुलाखतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
छायाचित्र / व्हिडीयो सौजन्य – Shankar Mahadevan Facebook Page