किडनी व यकृत प्रत्यारोपणाप्रमाणेच डोळ्याच्या कॉर्नियाचे देखील प्रत्यारोपण करता येते.पण आजही अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नाही.यासाठीच कॉर्नियल प्रत्यारोपणाविषयी सविस्तर माहिती आपल्यासा माहित असणे गरजेचे आहे.तसेच जाणून घ्या अवयव प्रत्यारोपण केल्यावर तुम्ही रक्तदान करु शकता का?
वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलचे Cornea, Cataract व Refractive Surgeon डॉ.हर्षवर्धन घोरपडे यांच्याकडून जाणून घ्या डोळ्याच्या कॉर्निया प्रत्यारोपणाविषयी ही सविस्तर माहिती .
- डोळ्यांचा कॉर्नियाचे प्रत्यारोपण करणे म्हणजे नेमके काय?
कॉर्निया हा डोळ्याच्या बाहेरील बाजूचा एक महत्वाचा भाग असतो.ज्याची रचना डोळ्याच्या बाहेरील बाजूने पारदर्शक काचेसारखी असते.काळ्या अथवा तपकिरी रंगाचे बुब्बुळ म्हणजे या कॉर्नियाच्या मधील एक पडदा असतो.डोळ्यांच्या लेंसवर पडणारा प्रकाश रेटीनावरुन परावर्तीत होतो व त्याचा संदेश मेंदूकडे पाठवला जातो.ज्या द्वारे आपल्याला एखादी प्रतिमा समजते.या क्रियेमध्ये कॉर्नियाचे काम डोळ्यांवर प्रकाश केंद्रित करणे हे असते.
जेव्हा एखादी दुखापत,इनफेक्शन,जन्मजात समस्या अथवा रासायनिक दुखापतीमुळे डोळ्याचा कॉर्निया अपारदर्शक होतो तेव्हा त्याचे प्रत्यारोपण करणे गरजेचे असते.कॉर्नियामध्ये ९९ टक्के पाणी व एक टक्का प्रोटीन व Mucopolysaccharides असते.प्रोटीन(जे कोलेजीन ने बनलेले असते) दुखापतीमुळे दाबले जाते(जसे की एखाद्या अंड्यातील पांढरा भाग उष्णतेमुळे बाहेर येतो).ज्यामुळे प्रकाश रॅटीनावर केंद्रित होत नाही.अशा परिस्थितीमध्ये एखादा नेत्रदाता उपलब्ध असल्यास कॉर्निया बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही.डोळ्याचा कॉर्निया दान करण्या-या व्यक्तीमधून काढून तो गरजू रुग्णाला बसविणे या प्रकियेला कॉर्नियल प्रत्यारोपण असे म्हणतात.जाणून घ्या भारतातील पहिल्या यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेबाबतची ’5′ खास वैशिष्ट्य !
- डोळ्याचा कॉर्निया कोण दान करु शकतो?
जिवंत व्यक्ती डोळ्याचा कॉर्निया दान करु शकत नाही.मृत्युपश्चात डोळ्याचा कॉर्निया दान करता येऊ शकतो.कायदेशीर नियमांनूसार एखाद्या जिवंत व्यक्तीचा कॉर्निया काढला जाऊ शकत नाही.तसेच वाचा जुही पवार – वडिलांना जीवनदान देणार्या कन्येची, प्रेरणादायी कहाणी
- कॉर्नियल प्रत्यारोपण कसे केले जाते?
एखाद्याने जिवंतपणी नेत्रदान केलेले असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात त्याच्या डोळ्यांचा कॉर्निया सहा तासांच्या आत काढण्यात येतो.सुरुवातीला संपूर्ण डोळा काढला जात असे पण आजकाल केवळ डोळ्याचा कॉर्निया काढण्यात येतो व तो MK Medium नावाच्या एका विशिष्ट माध्यमात ठेवण्यात येतो.त्यानंतर तो प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य स्थितीत आहे का हे तपासण्यासाठी आय बॅंकेकडे पाठविण्यात येतो.आय बॅकेने परवानगी दिल्यावर तो पुन्हा हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात येतो व प्रत्यारोपण करण्यासाठी गरजू रुग्णाला देखील शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात येते.
दुखापत अथवा इनफेक्शनमुळे रुग्णाचा पांढरा झालेल्या कॉर्निया काढून त्या जागी नवीन कॉर्निया जोडला जातो.तज्ञांमार्फत १६ टाके घालून रुग्णाच्या डोळ्याला हा कॉर्निया जोडण्यात येतो.या प्रक्रियेला कॉर्नियल ट्रान्सप्लान्ट अथवा कॉर्नियल प्रत्यारोपण असे म्हणतात.
- रुग्णावर कॉर्नियल प्रत्यारोपण केव्हा केले जाते?
नेत्रदान करणा-या दात्याकडून कॉर्निया प्राप्त झाल्यावर चार दिवसांच्या आत गरजू रुग्णावर त्याचे प्रत्यारोपण केले जाते.चार दिवसांनंतर कॉर्निया प्रत्यारोपण करण्यासाठी अपात्र ठरला जातो.मात्र काही केसेसमध्ये हा कॉर्निया Optisol किंवा Cornisol Corneal Storage Medium मध्ये साठवून तो १४ दिवस टिकवून ठेवता येऊ शकतो.मृत व्यक्तीचा कॉर्निया काढल्यावर तो एका बाटलीसारख्या माध्यमात ठेवला जातो.गरजू रुग्णाला ऑपरेशन थिएटर मध्ये बोलावण्यात येते. त्याचा जूना खराब झालेला कॉर्निया काढून त्याजागी त्वरीत नवीन कॉर्निया त्याला लावण्यात येतो.कारण या प्रक्रियेला उशीर झाल्यास डोळ्यामधील आतील भाग बाहेर येण्याची शक्यता असते.
- कॉर्नियल प्रत्यारोपणाचे प्रकार कोणते आहेत?
कॉर्नियल प्रत्यारोपणाचे दोन प्रकार आहेत.त्यातील एक प्रकार म्हणजे Traditional Corneal Transplant अथवा Penetrating Keratoplasty (PK) व दुसरा प्रकार Lamellar Corneal Transplant.यापैकी ट्रेडीशनल कॉर्नियल ट्रान्सप्लान्ट मध्ये रुग्णाचा संपूर्ण जखमी कॉर्निया काढून त्या जागी संपूर्ण नवीन कॉर्निया लावण्यात येतो.ही शस्त्रक्रिया Femtosecond Laser या सर्जिकल कटींग साधनाने केली जाते.या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे १४ टाके घालण्यात येतात.मात्र आजकाल च्या प्रगत तंत्रा द्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाचा संपूर्ण कॉर्निया काढण्याची गरज नसते.त्या ऐवजी फक्त कॉर्नियामधील दुखापत ग्रस्त भाग काढून त्या जागी तेवढाच नवीन भाग जोडला जातो.
कॉर्नियामध्ये बाह्य,मध्य व अंर्तभाग असे एकूण तीन थर असतात.जर यामधील त्या रुग्णाच्या कॉर्नियामधील आतील थर खराब झाला असेल तर फक्त तो भाग काढून त्याजागी पुन्हा नवीन कॉर्नियाचा केवळ अंर्तभागच लावण्यात येतो.कॉर्नियाच्या आतील थराला Endothelium असे म्हणत असल्यामुळे या प्रत्यारोपणाला Endothelial Transplant असे म्हणतात.त्याचप्रमाणे जर कॉर्नियाचा बाह्य थर खराब झाला असेल तर तेवढाच भाग काढून त्याजागी नवीन बाह्यथर जोडण्यात येतो.या प्रक्रियेला Lamellar Corneal Transplant असे म्हणतात.
- Traditional corneal transplant की Lamellar Corneal Transplant या दोन प्रकारापैकी नेमकी कोणती पद्धती करणे योग्य आहे?
Lamellar Corneal Transplant चा फायदा असा की या पद्धतीमध्ये डोळा संपूर्ण उघडावा लागत नाही ज्यामुळे इनफेक्शन होणे किंवा आतील टीश्यू बाहेर येण्याचा धोका कमी असतो.तसेच यामध्ये ट्रेडीशनल प्रत्यारोपण प्रकाराप्रमाणे १६ टाके टाकण्याची देखील गरज नसते.काही केसेसमध्ये तर या पद्धतीत टाके घालण्याचीच गरज लागत नाही.पण जर एखाद्या रुग्णाच्या कॉर्नियाचे तीनही थर खराब झाले असतील तर मात्र संपूर्ण कॉर्निया प्रत्यारोपण करणे गरजेचे असते.
- प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बाद होण्याचा धोका कधी असू शकतो?
जर संपूर्ण कॉर्नियाचे प्रत्यारोपण केले गेले असेल तर संपूर्ण नवीन डोळ्याला कॉर्निया जोडला गेल्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बाद होण्याचा धोका अधिक असू शकतो.मात्र तेच जर कॉर्नियामधील एखादा विशिष्ट थरच बदलला असेल तर प्रत्यारोपण बाद होण्याचा धोका कमी होतो.असे असले तरी तज्ञांच्या मते संपूर्ण कॉर्निया प्रत्यारोपण प्रक्रिया बाद होण्याची शक्यता ४० टक्के असू शकते.यासाठी वाचा दूर करा ‘अवयव दाना ‘संबंधीचे हे ५ गैरसमज
- या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे खर्च किती येतो?
जर तुम्ही सरकारी हॉस्पिटल मध्ये कॉर्नियल प्रत्यारोपण केले तर ते ब-याचदा विनामुल्य केले जाते. एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये मात्र या शस्त्रक्रियेसाठी २५ हजार ते ४० हजार इतका खर्च येऊ शकतो.तसेच ते नेत्रदान करणा-या दात्यावर देखील अवलंबून असू शकते.
- शस्त्रक्रियेपूर्वी कोणती तयारी करणे गरजेचे आहे का?
सामान्यत: यासाठी गरजू रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी दोन तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते.त्यासाठी आधी कराव्या लागणा-या टेस्ट रुग्णाला शस्त्रक्रिया होऊ शकते याची शाश्वती मिळाल्यावर १० ते १५ दिवस आधी अथवा महिनाभर आधी करण्यात येतात.त्यामुळे प्रत्यारोपण करण्यासाठी रुग्ण त्यादिवशी देखील हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ शकतो.या शस्त्रक्रियेसाठी दीड तास लागतो.त्यानंतर रुग्णाला तीन तास तज्ञांच्या देखरेखीखाली रहावे लागते.रुग्णाला त्याच दिवशी पुन्हा घरी देखील जाता येते.
- प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर नेमकी काय काळजी व दक्षता घ्यावी?
कॉर्नियल प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्णाने या चार गोष्टींबाबत विशेष दक्षता घ्यावी.पहिली गोष्ट म्हणजे टाके बरे होण्यासाठी कमीतकमी दोन महिने लागू शकतात.त्यामुळे रुग्णाने पुढील दोन महिने डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी.जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर टाके निघू शकतात.त्यामुळे या काळामध्ये वजन उचलू नये तसेच खाली वाकणे अथवा अति व्यायाम करु नये.घरी नुसते झोपून रहाण्याऐवजी योग्य ती दक्षता पाळून हलक्या स्वरुपाचा व्यायाम व दैनंदिन कामे करण्यास मुळीच हरकत नाही.ब-याचदा रुग्णांना पहिले काही आठवडे घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात येतो.तसेच डोळ्यात पाणी जाऊ नये यासाठी डोक्यावरुन अंघोळ करु नये.सतत डोळ्यांना हात लावल्यास अथवा डोळे चोळल्यास डोळ्यांना इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो त्यामुळे तसे करु नये.
- कॉर्नियल प्रत्यारोपण कधीपर्यंत उत्तम रहाते?
कॉर्नियल प्रत्यारोपण ५ ते १० वर्ष टिकते.तसेच ते नेत्रदान करणा-या दात्यावर देखील अवलंबून असू शकते.जर एखाद्या तरुण व्यक्तीचा निरोगी कॉर्निया घेतला असेल तर तो कॉर्निया १५ ते २० वर्षे चांगला राहू शकतो.याचे कारण असे की अशा कॉर्नियाच्या आतील थरातील पेशींची संख्या २५०० प्रती घनमीटर चौरस इतकी असते.त्यामुळे दान केल्यावर देखील त्या गरजू रुग्णाच्या कॉर्नियाचे आयुष्य वाढते.यासाठी वाचा ‘अवयव दान एक महादान’
मात्र जर हे नेत्रदान एखाद्या साठ वर्षांच्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे गरजेच्या असलेल्या वृद्ध व्यक्तीने केलेले असेल.तर त्यामधील पेशींची संख्या कमी असल्यामुळे त्या रुग्णाला पुन्हा चार ते पाच वर्षांनी प्रत्यारोपण करण्याची गरज लागू शकते.जर हे नेत्रदान कोणतीही डोळ्यांची समस्या नसलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीने केलेले असेल तर ते दहा वर्षे टिकू शकते.प्रत्यारोपणानंतर अगदी २५ वर्षे डोळा उत्तम असलेल्या अनेक केसेस आहेत.थोडक्यात अगदी गंभीर दुखापत होऊन कॉर्निया बाद न झाल्यास किमान पाच वर्षे प्रत्यारोपण व्यवस्थित राहू शकते.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock